एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अच्छे दिन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रतीक्षायादीतील संख्या ४०० वर पोहोचली आहे. त्यांना आता एसटीतील नोकरी किंवा सहाय्यता निधीपैकी एक पर्याय निवडता येणार आहे. एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील वारसास नोकरी देण्याची तजवीज आहे.

अकोला : एसटी महामंडळातील अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीत वर्षानुवर्षे रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आशेचा नवीन किरण लाभला आहे. कर्तव्यावर असताना निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर एसटीमध्ये सेवेत येण्याची संधी असते. परंतु, पदांसाठी असलेला कोटा आणि इतर कारणांमुळे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षायादीतील सदस्यांना सेवेत सहभागी होणे कठीण ठरते. त्यातून मार्ग काढत अशा प्रतीक्षायादीतील सदस्यांना १० लाख रुपयांपर्यंत सहाय्यता निधी देण्याचा पर्याय महामंडळाने दिला आहे.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रतीक्षायादीतील संख्या ४०० वर पोहोचली आहे. त्यांना आता एसटीतील नोकरी किंवा सहाय्यता निधीपैकी एक पर्याय निवडता येणार आहे. एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील वारसास नोकरी देण्याची तजवीज आहे. परंतु, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या पदांचे प्रमाण कमी असल्याने त्या सदस्यांची वर्णी लागणे कठीण होते. ही प्रतीक्षायादी वाढत जात आहे. त्यात, त्या सदस्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी कमाल वय ४५ वर्षे इतके आहे. ही वयाची मर्यादा उलटून गेली की नोकरीची संधी जाते. साधारणपणे स्वच्छक, शिपाई, क्लार्क, वाहतूक नियंत्रक आदी पदांसाठी अनुकंपा तत्त्वावरील सदस्य इच्छुक असतात.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतीक्षायादीतील सदस्यांच्या समस्येवर विचारविनिमय करण्यात आला. त्यात, परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अशा वारसांना दिलासा देण्यासाठी १० लाख रुपये सहाय्यता निधीचा पर्याय दिला आहे. नोकरीतील दावा वा सहाय्यता निधी यापैकी एक पर्याय सदस्यांना निवडता येणार आहे. या निर्णयामुळे अनेक सदस्यांना त्याचा फायदा होणार आहे. प्रतीक्षायादीतील काही सदस्य ४५ वर्षांच्या वयोमर्यादेच्या आसपास असल्याने त्यांना त्याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. वयाच्या पंचेचाळीशीनंतर नोकरीची संधी मिळणे कठीण असताना या वारसांना किमान सहाय्यता निधीने आधार मिळणार आहे. सेवामार्गात अनेक अडथळे कर्तव्यावर असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार नुकसानभरपाई आदी सर्व लाभ दिला जातो. त्याव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याची तरतूद आहे. मात्र, अनेकदा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वारसांचे वय कमी असणे, वय उलटून जाणे, शिक्षण आदींमुळे सेवेत येण्यात अडथळे ठरतात. या स्थितीत प्रतीक्षायादीतील सदस्यांची समस्या लक्षात घेत महामंडळाने विशेष निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: ST employee heir