महामंडळाची एसटी "हाऊसफुल्ल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मे व जून महिन्यांत लग्नाच्या तिथी सर्वाधिक राहतात. शिवाय शाळकरी मुलांची सुट्ट्या असल्याने एसटीकडे ओढ सर्वाधिक राहते. मे व जून महिन्यात प्रवाशांची तुडुंब गर्दी एसटी बसमध्ये राहत असल्याने त्यासाठी अमरावती विभागाने जादा फेऱ्यांचे नियोजनदेखील केले. प्रवाशांच्या गर्दीमुळे महामंडळाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा होत आहे...

अमरावती - लग्नप्रसंग आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने महामंडळाची एसटी हाउसफुल्ल असल्याचे चित्र अमरावती स्थानकात बघायला मिळते. सकाळपासूनच प्रवाशांची स्थानकात गर्दी होत असून रणरणत्या उन्हातही प्रवाशांचा दमदार प्रतिसाद एसटीला मिळत आहे.

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, अमरावती विभागातर्फे प्रवाशांसाठी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजनदेखील करण्यात आले. जूनअखेर संपूर्ण जिल्ह्यात अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येतील. यंदा प्रथमच जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संबंधित विभागाला प्राप्त झालेल्या होत्या. यावरून जिल्ह्यात 35 अतिरिक्त फेऱ्या उन्हाळी सुट्ट्यानिमित्ताने वाढविण्यात आल्या. परतवाडा-मोर्शी, अमरावती-परतवाडा, अमरावती-दर्यापूर, अमरावती-वरुड, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धारणी व चिखलदरा यासाठीही अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन अमरावती विभागातर्फे करण्यात आल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया यांनी सांगितले.

मे व जून महिन्यांत लग्नाच्या तिथी सर्वाधिक राहतात. शिवाय शाळकरी मुलांची सुट्ट्या असल्याने एसटीकडे ओढ सर्वाधिक राहते. मे व जून महिन्यात प्रवाशांची तुडुंब गर्दी एसटी बसमध्ये राहत असल्याने त्यासाठी अमरावती विभागाने जादा फेऱ्यांचे नियोजनदेखील केले. प्रवाशांच्या गर्दीमुळे महामंडळाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा होत आहे.

स्वतंत्र काउंटरवर प्रवाशांची गर्दी
परतवाडा व यवतमाळकरिता विनावाहक, विनाथांबा ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू आहे. त्यासाठी अमरावती स्थानकात दोन स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली. पाच रुपये अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांना आगाऊ आरक्षण मिळत आहे. सध्या अमरावती स्थानकातील या काउंटरवर प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे. अमरावती-यवतमाळसाठी यापूर्वी जिल्ह्यातून नऊ फेऱ्या सोडण्यात येत होत्या; त्यात आता सहा फेऱ्या वाढविल्या गेल्याने 15 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले.

Web Title: ST receives healthy response