एसटी थेट घरात शिरली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कोदामेंढी (जि.नागपूर)  : रामटेक आगाराची कामठीहून खिडकी या गावी जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस मंगळवारला रात्री साडेदहाच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट एका घरात शिरली.

कोदामेंढी (जि.नागपूर)  : रामटेक आगाराची कामठीहून खिडकी या गावी जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस मंगळवारला रात्री साडेदहाच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट एका घरात शिरली.
रामटेक-भंडारा मार्गावर वाकेश्वर फाट्याजवळ इजनी येथील नंदकिशोर युवराज साठवणे यांचे शेतात घर आहे. रामटेक आगारातून निघालेली एसटी बस कामठी, कोदामेंढी असा प्रवास करीत खिडकीला जात होती. रात्री साडेदहाच्या सुमारास, बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नंदकिशोर साठवणे यांच्या घरात शिरली. रस्त्यापासून घर जवळपास वीस फूट अंतरावर आहे. यात सुदैवानी कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे बसमध्ये यावेळी प्रवासी नव्हते. नंदकिशोर साठवणे यांच्या घरासमोरच्या चारचाकी वाहनाला बसने धडक दिली व घरात शिरली. चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला. घराचेदेखील नुकसान झाले. यावेळी घरात साठवणे कुटुंबीय झोपले होते. दैव बलवत्तर असल्याने त्यांना कसलीही दुखापत झाली नाही. नंदकिशोर साठवणे यांच्या गाडीचे आणि घराचे मिळून पाच लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. अरोली पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वासुदेव उपसराव पाटील (वय 42) या बसचालकास अटक केली. पुढील तपास ठाणेदार विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर हिंगे करीत आहेत.

काल रामटेक आगारातून कामठी मार्गे निघणारी खिडकी बस एक तास उशिरा निघाली. त्या मार्गाने चालक नेहमी जात असतो. मात्र अनवधानाने बसचे नियंत्रण सुटल्याने घटना घडली.
- कन्हैया भोगे, आगार व्यवस्थापक, रामटेक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST went straight into the house