पोलिसदादा चौकात उभे राहा!

file phote
file phote

नागपूर, : शहरातील सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे राहून मोबाईलवर खेळत असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा, तिथेच राहून पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. शहरात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या वाढत असताना त्यावर कोणीही कडक कारवाई का करीत नाही, अशी विचारणा हायकोर्टाने केली होती. शहरातील पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यावरील मोकाट जनावरे यांसारख्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.दरम्यान, शहरातील वाहतूक समस्यांवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा हायकोर्टाने 22 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या आदेशाची आठवण पोलिस आयुक्तांना करून दिली. त्या आदेशात सर्व वाहतूक पोलिस सिग्नलवर थांबणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले होते. परंतु, त्या आदेशांचे पालन होताना दिसून येत नसल्याची खंत हायकोर्टाने पुन्हा एकदा व्यक्त केली. वाहतूक पोलिस अद्याप रस्त्याच्या बाजूला झाडाखाली थांबलेले आढळतात. अनेकदा ते मोबाइलवर खेळत असतात अथवा संभाषण करीत असतात. वाहतूक सिग्नलचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई होताना दिसत नाही, अशी टीकाही न्यायालयाने केली.दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग केल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यानुसार, जानेवारी ते ऑगस्ट 2019 या कालावधीत सुमारे 13 हजार 459 जणांवर ड्रंक ऍण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम तोडले म्हणून जानेवारी ते जुलै या काळात 74 हजार 733 जणांवर कारवाई केली आहे. तेव्हा पोलिस आयुक्तांनी वाहतूक विभागात केलेल्या कामाचे कौतुक खंडपीठाने केले. परंतु, नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com