स्टारबस संचालकाला बडतर्फीची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नागपूर - शहर बस वाहतुकीत आमूलाग्र बदलाची तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, नव्या ग्रीन बससह आणखी तीन ऑपरेटर स्टारबस चालविणार आहे. त्यामुळे आतापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या वंश नियम या स्टार बस संचालकाला बडतर्फीची नोटीस महापालिकेने बजावली आहे. तीन महिन्यांत जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या बसेस महापालिकेला हस्तांतरित करण्याची सूचना वंश निमयला देण्यात आली आहे.

नागपूर - शहर बस वाहतुकीत आमूलाग्र बदलाची तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, नव्या ग्रीन बससह आणखी तीन ऑपरेटर स्टारबस चालविणार आहे. त्यामुळे आतापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या वंश नियम या स्टार बस संचालकाला बडतर्फीची नोटीस महापालिकेने बजावली आहे. तीन महिन्यांत जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या बसेस महापालिकेला हस्तांतरित करण्याची सूचना वंश निमयला देण्यात आली आहे.

नागपूरकर प्रवाशांच्या सेवेत 55 ग्रीन बससह नव्या 195 स्टारबसचीही भर पडणार असून, एकूण चार ऑपरेटरद्वारे शहर बससेवा चालविण्यात येतील. स्कॅनिया कंपनी ग्रीन बस चालविणार असून, ट्रॅव्हल्स टाइम कार रेंटल प्रा. लिमिटेड पुणे, श्‍यामाश्‍याम सर्व्हिस सेंटर दिल्ली, स्मार्टसिटी बससेवा नागपूर या कंपन्यांची स्टारबस चालविणार आहे. 5 डिसेंबरपासून 10 ग्रीन बस व 15 नव्या स्टारबसला शहरात सुरुवात होणार आहे. महिनाभरात उर्वरित 45 ग्रीन बस व 180 नव्या स्टारबसही सुरू होतील. या पार्श्‍वभूमीवर वादग्रस्त वंश निमय कंपनीला महापालिकेने बडतर्फीची नोटीस बजावली आहे. जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत मिळालेल्या 237 बसेस वंश निमयला चालविण्यास देण्यात आल्या होत्या. या बसेसचे तीन महिन्यांत हस्तांतरण करण्याच्या सूचना महापालिका वाहतूक विभागाने वंश निमयला केल्या आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांत शहराला वाहतूक सेवा देणारी वंश निमय शहरातून हद्दपार होणार आहे. जुन्या 237 स्टारबसेस नवीन ऑपरेटर कंपन्यांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात नव्या, जुन्या एकूण 487 बसेस धावतील. बस चालविणाऱ्या चारही ऑपरेटरवर दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टिम लिमिटेडचे नियंत्रण राहणार आहे.

वाहक, वाहनचालकांना नव्या ऑपरेटरकडे संधी ः बोरकर
वंश निमयकडील वाहनचालक, वाहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. वंश निमय हद्दपार झाल्यानंतर रोजगाराचे काय? अशी भीती त्यांच्यात आहे. परंतु या वाहक व वाहनचालकांना नव्या ऑपरेटरकडे संधी आहे. या वाहनचालकांना नव्या ऑपरेटरकडे अर्ज करता येणार आहे. वाहनचालक स्टारबस चालविणाऱ्या कंपनीकडे तर वाहकांनी ऑपरेटरवर नियंत्रण ठेवणाऱ्या दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रांझिट सिस्टिम लिमिटेडकडे अर्ज करावे, असे आवाहन परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी केले आहे.

Web Title: Star Bus Director formed notices