"स्टार'बसची अघोषित भाडेवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्यात येत असल्याने वाहतूक परावर्तित करण्यात आली आहे. स्टारबस व्यवस्थापनाने हेच कारण पुढे करीत भाडेवाढ करून वळणमार्गाचा भार प्रवाशांवर टाकला आहे. प्रवाशांना प्रतिफेरी 2 ते 7 रुपयांपर्यंतचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

नागपूर - छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्यात येत असल्याने वाहतूक परावर्तित करण्यात आली आहे. स्टारबस व्यवस्थापनाने हेच कारण पुढे करीत भाडेवाढ करून वळणमार्गाचा भार प्रवाशांवर टाकला आहे. प्रवाशांना प्रतिफेरी 2 ते 7 रुपयांपर्यंतचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

मेट्रोच्या ट्रॅकसाठी छत्रपती चौकातील उड्डाणपूल उद्‌ध्वस्त करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चौकातील वाहतूक अन्य मार्गाने परावर्तित करण्यात आली आहे. बुटीबोरी आणि हिंगणा मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना फेरा मारून जावे लागत आहे. वळणमार्गामुळे इंधनाचा खर्च वाढला आहे. हेच कारण पुढे करीत "स्टार'चे स्टेअरिंग सांभाळणाऱ्या वंश निमयने दोन्ही मार्गांवर प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता दरवाढ लादण्यात आल्याने बुटीबोरी, हिंगणा मार्गावरील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हिंगणा मार्गावरील प्रवाशांना टप्प्यानुसार 4 रुपयांपर्यंत तर बुटीबोरी मार्गावर 2 ते 7 रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

मंगळवारपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे. परंतु, प्रवाशांना त्याबाबत पूर्वसूचना नसल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. वाहकांकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये रोष आहे. प्रवाशांची ओरड लक्षात घेऊन व्यवस्थापनाने बुधवारी बसस्थानक आणि बसमध्ये दरवाढीचे स्टिकर लावण्याची तसदी घेतली. करारानुसार स्टारच्या दरवाढीसाठी मनपा प्रशासनाची मंजुरी आवश्‍यक आहे. परंतु, स्टार व्यवस्थापनाने केवळ सूचनेची खानापूर्ती करीत प्रवाशांवर दरवाढ लादली असल्याची माहिती आहे. 

10 हजार प्रवाशांना फटका 

बुटीबोरी आणि हिंगणा मार्गाने स्टारबसच्या दररोज सरासरी 226 फेऱ्या होतात. दोन्ही मार्गांवरील रोजची प्रवासी संख्या 10 ते 12 हजारांच्या घरात आहे. छत्रपती चौकापूर्वी उतरणारे मोजके प्रवासी वगळता उर्वरित सर्वांनाच दरवाढ सहन करावी लागत आहे. 

 

दरवाढ तात्पुरती 

पर्यायी वळणमार्ग तुलनेने छोटे असल्याने वाहतूक अवरुद्ध होऊन इंधनाची खपत वाढते. याचप्रमाणे वळसा घालून जावे लागत असल्यानेही इंधनाचा खर्च वाढला असून तो भरून काढण्यासाठी नियमानुसार किमान दरवाढ करण्यात आली आहे. हा मार्ग पूर्ववत सुरू झाल्यानंतर दरवाढ मागे घेतली जाणार असल्याचे स्टारबस व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Star bus fares increased undeclared