तीर्थक्षेत्र टाकरखेडला बसफेरी सुरु करा; भविकभक्तांची मागणी

राजेश सोळंकी
शुक्रवार, 11 मे 2018

टाकरखेडला ये-जा करणे भाविकांना त्रासदायक झाले आहे. तेव्हा भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अमरावती व तळेगाव आगराची बसफेरी सुरू करण्यात यावी. अशी मागणी भाविकभक्त करत आहेत.

आर्वी - श्री संत लहानुजी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकभक्तांना (अमरावती - नागपूर) या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा संबधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी अमरावती टाकरखेड आणि तळेगाव टाकरखेड खडका मार्गे बस सुरू करावी, अशी भाविकांची मागणी आहे.

अमरावती नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील खडका येथून केवळ सहा किमी अंतरावर तीर्थक्षेत्र टाकरखेड आहे. विशेष म्हणचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून उत्कृष्ठ दर्जाचा रस्ता बनविण्यात आला. पण या मार्गाने एसटी बसची एकही फेरी नाही, साधनाअभावी भाविकांना पायी प्रवास करावा लागतो त्यामुळे नागपूर व अमरावती कडून येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.

महाराजांचे भक्त विदर्भाच्या कानाकोपऱ्यात असून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी दूरवरून येतात. पण या मार्गाने बसफेरी नसल्याने निराश होऊन पायी चालत येतात. रस्ता असून बसअभावी हाल सोसावे लागतात. या परिसरात गुरुकुंज मोझरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वरखेडला परमहंस आडकूजी महाराज, विदर्भाचे पंढरपूर कौंडण्यापूर, जहागिरपूर असा हा संत महात्म्यांनी पावन झालेला परिसर त्यामुळे भाविकांची मोठी वर्दळ सुरू असतात. पण टाकरखेडला ये-जा करणे भाविकांना त्रासदायक झाले आहे. तेव्हा भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अमरावती व तळेगाव आगराची बसफेरी सुरू करण्यात यावी. तसेच संत दर्शनासाठी अमरावती कौडण्यापूर टाकरखेड गुरुकुंज मोझरी अशी बस फेरी चालू करावी अशी भाविकांची मागणी आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Start bus service to Pilgrimage Takarkhed demands people