मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेची जोरदार सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

लोकसहभागातून मोर्णा नदीतील कचरा व जलकुंभी मोठया प्रमाणात बाहेर काढण्यात आली असून नदी पात्र कचऱ्यातून मुक्त होत आहे.

अकोला - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरु असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठया प्रमाणात बाहेर काढण्यात आली असून नदी पात्र कचऱ्यातून मुक्त होत आहे. मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार आहे. नदीच्या स्वच्छतेसाठी शनिवार, दि. 24 मार्चला सकाळी ठीक 8 वाजता नदीकाठच्या गीतानगर जवळील नदी काठावर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मोर्णा नदी पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प अनेकजणांनी केल्यामुळे ही मोहिम आता मोठी चळवळ बनली आहे. उद्याच्या मोहिमेत मोठया प्रमाणात दिव्यांग तसेच तृत्तीयपंथीयांचा सहभाग राहणार आहे. याचबरोबर मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने यांच्यासह अधिनस्त सर्व अधिकारी, तलाठी, कर्मचारी, पोलिस पाटील सहभागी होणार आहेत. तसेच शेतकरी संघटनेचे मुरलीधर राऊत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते, रॅलीज इंडियाजचे सदस्य मोर्णा स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.

अकोल्याचे वैभव असणारी मोर्णा नदी जलकुंभी व कचऱ्याने विद्रुप झाल्याने तिच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून नदीची  स्वच्छता करण्याचे निश्चित केल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, शिक्षक, विदयार्थी, पत्रकार आणि नागरिकांनी ही मोहिम यशस्वी करण्याचे ठरविले. दि. 13 जानेवारीपासून दर शनिवारी लोकसहभागातून मोर्णाची स्वच्छता अविरत सुरु असल्यामुळे मोर्णा स्वच्छ करण्यात मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेमुळे नदीचे रुप पालटून गेले असून नदी आता खळाळून वाहताना दिसत आहे. 

मात्र नदीची स्वच्छता अदयाप बाकी असल्याने दि. 24 मार्च रोजी पुन्हा एकदा नागरिकांनी स्वच्छता मोहिमेकरीता योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जात आहे. नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा व मनपा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. कोणालाही दुखापत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणालाही प्रत्यक्ष नदीच्या आत जाऊन स्वच्छता करावी लागणार नाही, त्यासाठी अनुभवी कामगारांचे साहय घेतले जाणार आहे. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने व शांततेने स्वच्छता करावी. स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: The start of cleanliness campaign of the Morna river in akola