दिवाळीपूर्वी कापूस खरेदी सुरू करा : किशोर तिवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

दसऱ्यानंतर नवीन कापूस बाजारात आला. मात्र, व्यापारी तीन हजार 550 रुपये दराने खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी हमीभाव अधिक एक हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे.  

यवतमाळ : कापसाची खरेदी खासगीत साडेतीन ते चार हजार रुपये दराने केली जात आहे. हे दर हमीभावापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सरकारने राज्यात सीसीआयच्या सर्व संकलन केंद्रांवर दिवाळीपूर्वी कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. 
किशोर तिवारी यांनी कापूस खरेदीचा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन त्यांना सांगितला. देशातील सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सरासरी 40 लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होत आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागाचे शेती अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. अलीकडे गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले. 2018-19 च्या हंगामात 42 लाख 54 हजार हेक्‍टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली होती. उत्पादन केवळ 71 लाख गाठी झाले. 
भारतात कापसाची आयात मागील दोन वर्षांत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड वाढली आहे. व्हिएतनाम व बांगलादेशातून चीनमध्ये निर्यात वाढली. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षांत कापसाच्या हमीभावात शंभर रुपये वाढ करून पाच हजार 550 रुपये प्रतिक्विंटल भावाची घोषणा केली. दसऱ्यानंतर नवीन कापूस बाजारात आला. मात्र, व्यापारी तीन हजार 550 रुपये दराने खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी हमीभाव अधिक एक हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start Cotton Shopping Before Diwali: Kishore Tiwari