बचतगटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची सुरुवात करा : पालकमंत्री मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मूल (जि. चंद्रपूर) : बचतगटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करावी. जिल्ह्यामध्ये कौशल्यविकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचतगटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मूल (जि. चंद्रपूर) : बचतगटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करावी. जिल्ह्यामध्ये कौशल्यविकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचतगटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महिलांमध्ये कौशल्यविकासाचे नवीन मॉडेल म्हणून उदयाला आलेल्या "भाऊ' या बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या चौथ्या केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक एस. वी. रामाराव, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पंचायत समिती सभापती पुष्पा डोहणे, जिल्हा परिषद सदस्य संध्या गुरनुले, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, महिला विकास आर्थिक मंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यात महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी पुढे यावे. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळावी. आपल्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात विकल्या जाव्यात यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने बाजाराचा अभ्यास करणारी टीम तयार करावी. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. यासाठी श्रीमती सुमतीताई सुकळीकर योजनेंतर्गत शून्य दराने कर्जवाटप केले जात आहे. अल्पसंख्याक समुदायासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात बचतगट सुरू करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्येसुद्धा एक योजना तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महिलांनी प्रतिसाद द्यावा.
यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या डिप्लोमा इन बांबू टेक्‍नॉलॉजी बॅचच्या तिसऱ्या तुकडीला साहित्य वाटप करण्यात आले. पालकमंत्री बांबू समृद्धी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप करण्यात आले. नगरपरिषद मूलने स्वच्छ संरक्षण 2019 मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर, महिला बचतगटांना बांबू प्रशिक्षणांतर्गत साहित्याचे कीट वाटप करण्यात आले.
मूल रेल्वेस्थानकाचे होणार सौंदर्यीकरण
संपूर्ण भारतात आकर्षक असे दोन रेल्वेस्थानक म्हणून चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वेस्थानकाचा नावलौकिक आहे. मात्र, आता मूल रेल्वेस्थानकही भारतीय रेल्वेच्या आकर्षक रेल्वेस्थानकाच्या यादीत आले पाहिजे. यासाठी मूल रेल्वेस्थानकाचे सौंदर्यीकरण करावे, असे निर्देश वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start Financial Truth through Savings Groups: Guardian Minister Mungantiwar