वृक्षलागवड, संवर्धनात राज्य अग्रेसर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

नागपूर : वृक्षलागवड व जलसंधारण कार्य हे अवेळी पाऊस, पर्यावरण असंतुलनावर नियंत्रणासाठी उपयोगी आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. वृक्षलागवड ही वनविभागाचीच मोहीम नसून सर्व नागरिकांची आहे, असेही ते म्हणाले.

नागपूर : वृक्षलागवड व जलसंधारण कार्य हे अवेळी पाऊस, पर्यावरण असंतुलनावर नियंत्रणासाठी उपयोगी आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. वृक्षलागवड ही वनविभागाचीच मोहीम नसून सर्व नागरिकांची आहे, असेही ते म्हणाले.
शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या प्रारंभ आज मिहान प्रकल्पातील जलशुद्धीकरण परिसरात केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, विमानतळ विकास कंपनीचे सल्लागार एस. व्ही. चहांदे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार उपस्थित होते. ते म्हणाले, जलसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला वृक्षलागवड ही मोहीम अत्यंत उपयुक्त आहे. वृक्षांमुळेच पाण्याचे संवर्धन होते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्य पाण्याचा थेंब न्‌ थेंब संवर्धित करून दिवसेंदिवस खालावत असलेल्या पाणीपातळीत वाढ करणार आहे. वृक्षलागवड जनतेची मोहीम व्हावी, लोकचळवळ व्हावी.
पाच वर्षांत देशात सर्वाधिक वृक्षलागवड महाराष्ट्रात झाली असून, वृक्षसंवर्धनातही राज्य अग्रेसर आहे. बांबू हा बहुपयोगी वृक्ष असल्याने बांबूची झाडे मोठ्या प्रमाणावर लावावीत. तत्पूर्वी बावनकुळे यांनी "रोपे आपल्या दारी' या फिरते रोपे विक्री केंद्राला हिरवी झेंडी दाखवून उद्‌घाटन केले.
वृक्षलागवड ही लोकचळवळ व्हावी, असे सांगून वृक्षलागवडीमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होते. पर्यावरण संतुलित राहते आणि तापमानवाढ रोखण्यास मदत होते. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होत, प्रत्येकाने वृक्ष आणि जलसंवर्धन केले पाहिजे, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी. कल्याणकुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वृक्षप्रेमी, विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, हरित सेनेचे सदस्य, वनकर्मचारी, सेंट जोसेफ हायस्कूल, जयताळाचे विद्यार्थी, पेस हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Advancing in tree planting, conservation