अत्याधुनिक सुविधा केंद्रासाठी येस बॅंक, प्रोमार्कची मदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

परीक्षा भवनात सुविधा केंद्र उभाण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी आवश्‍यक ती कारवाई सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत केंद्र सुरू झालेले असेल. 
- डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षा भवन परिसरात विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. लवकरच परीक्षा भवनातील हे केंद्र प्रोमार्क आणि येस बॅंक यांच्या मदतीने सुरू करण्यात येणार आहे. 

गोंदिया, वर्धा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांतील लाखो विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. दररोज विद्यार्थी विविध समस्या घेऊन विद्यापीठात येतात. प्रवेश, पदवी, प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी हेलपाट्या घालताना दिसून येतात. बहुतांश विद्यार्थ्यांच्या समस्या परीक्षेशी संबंधित आहेत. या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्र असावे, याबाबत अनेकदा सिनेटमध्ये चर्चा झाली. या विषयावर विद्यार्थी संघटनांची आंदोलनेही झाली आहेत. तरीही हे काम रखडले असल्याने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पुढाकार घेत एमकेसीएलच्या मदतीने विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला. जानेवारी महिन्यात हे केंद्र सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, अजूनही केंद्र सुरू झाले नाही. 

यासंदर्भात प्र-कुलगुरूंकडे विचारणा केली असता त्यांनी हे केंद्र सुरू होणार असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने "ऑनलाइन गेट वे पेमेंट'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

असे राहील केंद्र 
सुविधा केंद्रात एकूण बारा काउंटर तयार करण्यात येणार आहेत. यातील दहा काउंटर शाखानिहाय समस्यांसाठी राहतील. दोन काउंटर पर्यवेक्षकांसाठी राहतील. विद्यार्थ्यांना टोकन क्रमांक देऊन त्याला पर्यवेक्षकाकडे पाठविणार येणार आहे. संपूर्ण केंद्र संगणकीकृत राहील.

Web Title: State of the art facilities for Yes Bank