विदर्भाची कृषी पंढरी गजबजणार

PDKV.jpeg
PDKV.jpeg

अकोला : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘ॲग्रोटेक 2019 ’चे 27 ते 29 डिसेंबर दरम्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले असून, हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने विदर्भाची ही कृषी पंढरी गजबजणार आहे. 


डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सन 1959 साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘जागतिक कृषी प्रदर्शनाचे हिरक महोत्सवी वर्ष’ तसेच ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष’ आणि कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्तपणे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला कृषी महाविद्यालयासमोर विद्यापीठ क्रीडांगणात हे प्रदर्शन भरणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांचे मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी सहपरिवार यावे आणि आपले इष्ट, मित्र, नातेवाईक, शेजारी आदींना कृषीच्या या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन संचालक विस्तार शिक्षण डॉ.दिलीप मानकर यांनी केले आहे.

माहितीचा खजाना
शेतीशास्त्रातील अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य विकास, पूरक व्यवसाय, गट शेती, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आशादायी, प्रेरणादायी, व्यवसायाभिमूख माहितीचा खजिनाच या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. 

या दालनांची मांडणी
या प्रदर्शनात फळबाग, भाजीपाला, वनौषधी, फुलशेती, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुपालन व दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, इत्यादी विषयावर आधारित विविध विभागांची दालने तसेच इतर शासकीय, निमशासकीय, सेवाभावी, स्वयंसेवी, खाजगी, संस्थांचे सुद्धा दालने शेतकरी बंधू भगिनींचे मनोबल वाढविणार आहेत. याचवेळी प्रयोगशील शेतकरी, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आत्मा कृषी विभाग, महानगरपालिका, स्वयंसहायता महिला बचत गट, कृषी पूरक व्यवसाईक यांची सुद्धा  विशेष दालने प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहेत.

सुसंवाद, मनोगत, प्रबोधन आणि मनोरंजनाचा झरा
प्रदर्शनादरम्यान दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रगतीशील शेतकऱ्यांचे मनोगत व मान्यवरांचे संबोधन, सत्यपाल महाराजांची सत्यवाणी आणि हास्यकवी ॲड.अनंत खेळकर  यांचे सादरीकरण उपस्थितामध्ये नवचैतन्य भरणार आहेत. शिवाय सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘पथनाट्या’द्वारे कृषी विषयक प्रबोधन करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com