"एक देश, एक कार्ड'साठी मेट्रोची पावले

सीताबर्डी ः महाकार्डचे लोकार्पण करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, एसबीआयचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्यासोबत इतर अधिकारी.
सीताबर्डी ः महाकार्डचे लोकार्पण करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, एसबीआयचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्यासोबत इतर अधिकारी.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक देश, एक कार्ड' योजनेला बळकट करीत महामेट्रोनेही एसबीआयच्या सहकार्याने महाकार्ड तयार केले. महामेट्रोच्या महाकार्डने मेट्रोतून सुखद प्रवास करणे शक्‍य होणार आहे. शिवाय बस, टॅक्‍सीसह भविष्यात खरेदी आदी किरकोळ खर्चासाठीही एटीएम कार्डसारखा वापर करता येणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी आज नमूद केले.
महामेट्रो व एसबीआयचे महाकार्ड व मेट्रोतून प्रवासासाठी उपयुक्त महामेट्रो ऍपचे लोकार्पण डॉ. ब्रजेश दीक्षित यांच्या हस्ते आज सीताबर्डी येथील मेट्रो इंटरचेंज स्टेशनवर झाले. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी एसबीआयचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार, महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) महेशकुमार, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक जयप्रकाश दहरिया, कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर, कार्यकारी संचालक गिरीधर पौनीकर, एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक आशुतोष शर्मा, ऍरॉन प्रोचे कार्यकारी उपाध्यक्ष संजय बाली उपस्थित होते. मोबाईल ऍपद्वारे नजीकच्या स्टेशनच्या स्थिती, स्टेशनवरील सुविधा आदींबाबत नागरिकांना माहिती घेता येणार आहे. प्रवाशांना मोबाईलवरच क्‍यू आर तिकीट तयार करता येणार असून, प्रवास करता येणार आहे. ऍन्ड्रॉईड फोनधारकांना गुगल प्लेमधून ऍप डाऊनलोड करता येईल. नागरिकांना तिकीटसाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही, ऍपमधूनच तिकीट खरेदी करता येईल. यासाठी क्रेडीट, डेबीट कार्ड किंवा नेट बॅंकिंगचा वापर करणे शक्‍य होणार आहे. महाकार्डवरून केवळ मेट्रो प्रवासच नव्हे तर किरकोळ खरेदीही करणे शक्‍य होईल. ऍपच्या माध्यमातून महाकार्ड रिचार्ज करता येईल. अशाप्रकारे देशात प्रथमच कार्ड तयार करण्यात आल्याचे एसबीआयचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांनी सांगितले. विदेशातही न्यूयॉर्क आदी शहरात ही सुविधा नाही. अशा सुविधा नागपुरात उपलब्ध करून दिल्या जात असल्याने तसेच मेट्रोसोबत संयुक्तपणे कार्ड तयार करण्यात आल्याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.
महाकार्ड खरेदीत सवलत
महामेट्रो कार्ड आजपासून नागरिकांना देण्यात आले. मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर काही नागरिकांनी आज महाकार्ड खरेदी केले. या महाकार्डची किंमत 150 रुपये आहे. परंतु, पहिल्या हजार नागरिकांना सवलतीच्या दरात, 100 रुपयांत देण्यात येत आहे. हे महाकार्डमध्ये 150 ते दोन हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येते. महाकार्डमधील पूर्ण बॅलेन्स रक्कम संपुष्टात आल्यानंतर महामेट्रोच्या कुठल्याही स्टेशनवर भेट देऊन कार्ड रिचार्ज करता येईल. कार्ड रिचार्ज करण्यासाठी रोख रक्कमही देता येईल, शिवाय डेबिट किंवा क्रेडिट कार्डनेही रिचार्ज करता येईल.
कार्डसाठी आवश्‍यक कागदपत्रे
नागरिकांनी महाकार्डसाठी पासपोर्ट क्रमांक, मतदान ओळखपत्र क्रमांक, वाहनचालक परवाना क्रमांक, नरेगा कामावरील ओळखपत्र क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आवश्‍यक आहे. मेट्रोच्या कुठल्याही स्टेशनवरील काऊंटरवर महाकार्ड मिळविता येईल. पूर्ण माहितीसह अर्ज भरून ऑपरेटरला द्यावा लागेल. संगणकात संपूर्ण माहिती अपलोड केल्यानंतर ऑपरेटर तुमच्या मोबाईलवर "वन टाईम पासवर्ड' (ओटीपी) पाठविणार आहे. ओटीपीचा वापर करून तुमचा क्रमांक वैध करता येईल. कार्ड शुल्क भरल्यानंतर रिचार्ज करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com