डम्पिंग यार्ड भडकले, वस्त्या विषारी धुरात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नागपूर - अवघ्या शहराच्या कचऱ्याने कवेत घेतलेल्या भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डला आज सकाळी आग लागली. उशिरा रात्रीपर्यंत आगीची धग कायम असून, भांडेवाडी परिसरातील अनेक वस्त्या विषारी धुरात दिसेनाशा झाल्या. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

नागपूर - अवघ्या शहराच्या कचऱ्याने कवेत घेतलेल्या भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डला आज सकाळी आग लागली. उशिरा रात्रीपर्यंत आगीची धग कायम असून, भांडेवाडी परिसरातील अनेक वस्त्या विषारी धुरात दिसेनाशा झाल्या. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याची साठवणूक केली जाते. मंगळवारी सकाळी एखाद्याने विडी पेटवून येथे टाकल्याने आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला लकडगंज, कॉटन मार्केट, सुगतनगर येथील अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहने बोलावण्यात आली. दुपारीपर्यंतही आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नव्हते. त्यामुळे पुन्हा साडेचार वाजता लकडगंज, कळमना, सक्करदार येथून अग्निशमन वाहने बोलावण्यात आली. आज रात्री साडेदहा पर्यंत आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार डम्पिंग यार्ड परिसरात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हजर होते. रात्रीपर्यंत 32 अग्निशमन वाहनांनी आगीवर पाणी ओतले. परंतु, आगीची धग उशिरा रात्रीपर्यंत कायम होती. दिवसभर आग कायम असल्याने या कचऱ्यातून निघणाऱ्या धुराने या परिसरातील वस्त्या दिसेनाशा झाल्या होत्या. सध्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा साठविण्याची क्षमता नसून, इतरत्र कत्तलखाना परिसरातही कचरा साठविण्यात येत आहे. दररोज 900 टन कचरा येथे टाकल्या जात असून, दिवसेंदिवस वाढत आहे. या कचऱ्यात प्लास्टिकसह सडके अन्न, कागदांसह विषारी पदार्थही असतात. त्यामुळे येथे लागलेल्या आगीतून निघणाऱ्या धुराचा परिणाम या परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. 

डम्पिंग यार्ड हटविण्याकडे दुर्लक्ष 
डम्पिंग यार्ड परिसरात शेकडो वस्त्या आहेत. डम्पिंग यार्डची दुर्गंधी आणि आग लागल्यानंतर विषारी धुराने या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी आहे. परंतु, या मागणीला राज्यकर्त्यांकडून केवळ होकार मिळत असून, प्रत्यक्ष प्रक्रिया होत नसल्याने येथील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Stirred up the dumping yard