डॉक्‍टरांच्या रिक्त पदांची ओरड बंद करा ः पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

अमरावती : जिल्ह्यात आरोग्य विभागाची अवस्था वाईट आहे. त्याला नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे, असा ठपका ठेवत रिक्त पदांची ओरड बंद करून उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य वापराद्वारे नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकारी व शल्य चिकित्सकांना दिले.

अमरावती : जिल्ह्यात आरोग्य विभागाची अवस्था वाईट आहे. त्याला नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे, असा ठपका ठेवत रिक्त पदांची ओरड बंद करून उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य वापराद्वारे नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकारी व शल्य चिकित्सकांना दिले.
डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सोमवारी (ता. 15) सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात डॉक्‍टरांची संख्या 105 व प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या 59 आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला; तरी डॉक्‍टर कमी पडत नाहीत, असे सांगत 105 डॉक्‍टर राहतात कुठे, असा प्रश्‍न पालकमंत्र्यांनी केला.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्‍टरांची तात्पुरती सेवा तालुकास्तरीय रुग्णालयांसाठी घेण्यात यावी, बदली डॉक्‍टर रुजू झाल्यानंतरच जिल्ह्यातील डॉक्‍टरला मुक्त करावे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल अटेंडन्स घेण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. एकाही प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप दिसता कामा नये, अन्यथा हात धुऊन पाठीमागे लागेन, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
बुके घेऊन आणि बदलीचा विषय घेऊन कोणीही आपल्याकडे येऊ नये, त्या उलट प्रश्‍न घेऊन यावे, शासनाकडून काय पाहिजे, त्याचा पाठपुरावा करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. कृषी विभागाच्या पीककर्ज, कर्जमाफी व विविध योजनांसह आवास योजना, घरकुल जागा खरेदीसाठी अर्थ साहाय्य योजना, रस्ते बांधकाम, प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्याची स्थिती, पाणीपुरवठा, स्वयंसिद्धा, तूर-हरभरा खरेदी अनुदान, सिंचन प्रकल्पांची स्थिती, कृषिपंप जोडणी, स्पर्धा परीक्षा केंद्र आदींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजय निपाने बैठकीला उपस्थित होते.
आमदार बुंदिले यांची उपस्थिती
कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी घेतलेल्या जिल्हास्तरीय बैठकीला दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले यांच्याशिवाय इतर कोणीही आमदार उपस्थित नव्हते.
सीताफळ हब तयार करा
वनविभाग व कृषी विभागाने किमान शंभर एकर जागेत सीताफळ हब तयार करावा, त्याचा प्रकल्प आराखडा तयार करावा, अशी सूचना या बैठकीत कृषिमंत्र्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the vacant posts of the doctor: Guardian Minister