गोंदियात वादळ; जनजीवन विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

गोंदिया : शुक्रवारी दिवसभर कडाक्‍याचे ऊन तापत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्ह्यात वादळ आले. हे वादळ कुठे तासभर तर, कुठे अर्धातासापर्यंत कायम होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळात वीज तारा तुटल्याने शहरासह ग्रामीण भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला.

गोंदिया शहरात सायंकाळी साडेपाचला वादळवारा सुटला. तुफान हवेच्या झोतात फूटपाथवरील दुकानांचे छत उडाले. सर्कस ग्राउंड परिसरातील साहित्य तुटून पडले. लहान व्यापाऱ्यांची धांदल उडाली. या वादळात सायंकाळी सहाच्या सुमारास तुरळक पावसानेदेखील हजेरी लावली. शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागांतील विद्युतपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची माठी पंचाईत झाली. तिरोडा येथे रेल्वेस्थानक रस्त्यावरील साई प्लाझाजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. विद्युत तारे तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
आमगाव येथे सायंकाळी सोसाट्याचा वारा वाहू लागला. पानटपरी व फूटपाथवाल्यांच्या दुकानांवरचे छत उडाले. वादळवाऱ्यात तुरळक पाऊस पडल्याने अनेकांची धांदल उडाली. रात्री उशिरापर्यंत तालुक्‍यात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सडक अर्जुनी, देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्‍यात ढग दाटून आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: storm in gondia