वादळी पावसाने उडवली झोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित, छपरेही उडाली

अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित, छपरेही उडाली
नागपूर - नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार वादळाने चोरपावलांनी प्रवेश करून शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला. जवळपास तासभर चाललेल्या वादळी पावसाने अनेक भागांत टिनाची छपरे उडाली. ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.

अवकाळी पावसाने सोमवारी सायंकाळी शहराच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावल्यानंतर मध्य रात्री पुन्हा वादळ आले. रात्री दोनच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळाला सुरुवात झाली. तासभर हवेसोबतच कानठळ्या बसणारा विजांचा कडकडाट आणि आकाशात विद्युल्लतांचा खेळ सुरू होता. हे भीतिदायक चित्र नागपूरकरांच्या उरात धडकी भरविणारे होते. वादळाने शहराच्या जवळपास सर्वच भागांना जोरदार तडाखा दिला. सकाळी जागोजागी पाण्याचे डबके साचले होते. वादळामुळे ठिकठिकाणी टिनाची छपरे उडाल्याचे आणि झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. मात्र, कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागातर्फे सांगण्यात आले.

वादळ सुरू होताच महावितरण व एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक भागांतील वीज बंद केली, तर काही भागांतील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. वादळामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, किमान तापमान तब्बल चार अंशांनी खाली आले. शहरात सकाळी साडेआठपर्यंत 5.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक पाऊस वर्धा येथे 15.8 मिलिमीटर झाल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

उकाडा वाढला
पाऊस व ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात घट झाली असली तरी, कमाल तापमान 42.4 अंशांवर गेल्याने उकाडा वाढला आहे. असह्य उकाड्यामुळे शरीरातून घामाचे लोट वाहिल्याने नागपूरकर दिवसभर अस्वस्थ होते. ऊन-पावसाचा खेळ आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत, हवामान विभागातर्फे देण्यात आले.

Web Title: storm rain in nagpur