तुफान वारा.. पाऊस धारा.... आम्हा न शिवे

केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर ः शतकानुशतके व्यवस्थेच्या गुलामगिरीत बंदिस्त अस्पृश्‍य बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी समता, बंधुता आणि न्याय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. धम्मक्रांतीतून महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत खांद्यावर निळा झेंडा घेऊन विविध राज्यातून भीमसागर दरवर्षी येथे येतो. 63 वर्षे लोटली. आता सोयी सुविधा आहेत. परंतु, चार दशकांपूर्वी साधनांचा अभाव होता. यामुळे गरीब बिचाऱ्या भीमसैनिकांना रेल्वेशिवाय पर्याय नव्हता. भीमसागराला उधाण येत असल्याने रेल्वेचे डबे अपुरे पडत होते.

नागपूर ः शतकानुशतके व्यवस्थेच्या गुलामगिरीत बंदिस्त अस्पृश्‍य बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी समता, बंधुता आणि न्याय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. धम्मक्रांतीतून महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत खांद्यावर निळा झेंडा घेऊन विविध राज्यातून भीमसागर दरवर्षी येथे येतो. 63 वर्षे लोटली. आता सोयी सुविधा आहेत. परंतु, चार दशकांपूर्वी साधनांचा अभाव होता. यामुळे गरीब बिचाऱ्या भीमसैनिकांना रेल्वेशिवाय पर्याय नव्हता. भीमसागराला उधाण येत असल्याने रेल्वेचे डबे अपुरे पडत होते. अशावेळी रेल्वेच्या छतावर बसून "तुफान वारा, पाऊस धारा न आम्हास शिवे..' असे वामनराव कर्डकांच्या शब्दांचा गजर करीत धम्मक्रांतीने भारावलेले तुफानातील दिवे जीव धोक्‍यात घालून येथील बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्यासमोर मेणबत्ती पेटवून अभिवादन करीत होते. रेल्वेच्या छतावर बसून आलेल्या भीमसागराला कवेत घेत त्यांना स्वाभिमानाचा नवा श्‍वास दीक्षाभूमीतून मिळत असे. हे चित्र आता हरवले. काळ बदलला. अशिक्षित, अर्धशिक्षित भीमसैनिकांनी आपल्या लेकरांच्या हातात बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवरून आणलेली लेखणी दिली. भीमाची लेकरे शिकली. मोठी झाली. टाय अन्‌ बुटातून विमानातून दीक्षाभूमीवर येत आहेत.
दीक्षा सोहळ्याच्या रौप्य महोत्सवापर्यंत रेल्वेत प्रचंड गर्दी करून भीमसागर दीक्षाभूमीवर येत होता. आताही आपापल्या सोयीने हा सारा भीमसागर येतो. आताही प्रत्येकाच्या हाती पंचशील ध्वज, डोक्‍याला निळ्या पट्ट्या, पांढरा पोशाख, महामानवाने मनात चेतवलेली समतेची मशाल आणि उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून हजारो आंबेडकरी अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. 63 वर्षांपासून दीक्षाभूमी ही अशोक विजयादशमीच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यात सहभागी होऊन बाहेरगावचे आंबेडकर अनुयायी सीमोल्लंघन करतात.

शिदोरीतील शिळी भाकर
चहात बुडवून खाणारी "माय'
चाळीस वर्षांपूर्वी दीक्षाभूमीवर स्मारकाचे पिल्लर तेवढे उभे दिसत होते. मात्र, भीमसागराला येथे उधाण येत होते. दीक्षाभूमीवर येताना कांदा भाकरीची शिदोरी घेऊन निघणारा अनुयायी. फाटक्‍या लक्तरातील माय, डोक्‍यावर निळी टोपी घातलेला काका, चार ते पाच दिवसांनंतरही शिदोरीतील शिळी भाकरी चहात बुडवून खात होते. हे चित्र बघून कोणाचेही काळीज तुटत नव्हते. आज कष्टाच्या त्या भाकरीतून बाबासाहेबांचा अनुयायी मोठा झाला, गाडी बंगला आला. परंतु, आंबेडकरी चळवळीला नख लावण्यासाठी आम्हीच फितूर होऊ लागलो, अशी खंत मार्शल सुनील सारिपुत्त या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने व्यक्त केली.

बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक रेल्वेच्या छतावर बसून येते होते. शिदोरीतील आठ दिवसांची शिळी भाकर खात होता. तो प्रामाणिक होता. याच धम्मक्रांतीने भीमसैनिकांच्या जीवनात मूलभूत बदल झाला. सांस्कृतिक कायापालट करणारी ती धम्मक्रांती...या विचारक्रांतीतून आचारक्रांतीचा प्रवास सुरू झाला. पन्नास वर्षे बाबासाहेबांच्या क्रांतीचा रथ मागे गेला नाही. परंतु, आता समाजाची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे. ज्या खांद्यावर जबाबदारी आहे, ते खांदे बेजबाबदार निघाल्याने आंबेडकरी जनता हादरली. हा अस्वस्थ करणारा प्रश्‍न आंबेडकरी महाशक्‍तीपुढे उभा आहे.
- इ. मो. नारनवरे, ज्येष्ठ आंबेडकरी कवी, साहित्यिक, नागपूर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stormy winds .. rain streams ....