तीन बायकांच्या दादल्याची अजबगजब कहानी वाचली का? 

three wife story
three wife story

अमरावती : लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हटले जाते. आयुष्यात लग्न हे एकदाच होते मात्र काही जणांना विशिष्ट कारणांमुळे दुसऱ्यांदा देखील लग्न करावे लागते. असे असले तरी एका महाभागाने चक्क एक-दोन नव्हे तर तीनदा लग्न केले. आता त्याचा हा आगाऊपणा चांगलाच अंगलट आला आहे. वाचा संपूर्ण कहाणी... 

मोरेश्वर रमेश भाकरे (वय 45) हा मूळ नांदगावपेठ परिसरातील रहिवासी असून, सहा वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीसोबत काही वर्षे त्याने संसार केला. तरीदेखील अनेक महिलांवर त्याची नजर राहायची. एकापाठोपाठ एक इतर महिलांना तो गाठत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने पहिलीशी दुरावा करून दुसरीसोबत संसार थाटला. यानंतर त्याने पहिल्या पत्नीचा छळ करणे सुरू केले. 

पहिल्या पत्नीचा छळ 
मोरेश्वरने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने पहिल्या पत्नीला खंडणी मागितली होती. या प्रकारावरून संतापलेल्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून आठ महिन्यांपूर्वीच मोरेश्वरविरुद्ध नांदगावपेठ ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यात त्याला पोलिसांनी अटकसुद्धा केली होती. दुसरीसोबत त्याने नोंदणी विवाह केला. परंतु तिच्यासोबत सुद्धा फार काळ त्याचा संसार टिकला नाही. 

दुसऱ्या पत्नीचे हडपले दागिने 
कालांतराने त्याने दुसऱ्या पत्नीचा देखील मानसिक छळ सुरू केला. कारण त्याच्या आयुष्यात तिसरीनेही प्रवेश केला होता. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह झालेल्या मोरेश्वरच्या दुसऱ्या पत्नीने आपल्या भेटवस्तू व दागिने परत देत नसल्याची तक्रार नांदगावपेठ ठाण्यात नोंदविली. त्यात मोरेश्वर विरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकारानंतर त्याचे दुसरे लग्न देखील तुटले. 

अवश्य वाचा - अमरावतीकर, जरा जपून ओलांडा रेल्वेक्रॉसिंग

तिसऱ्या पत्नीवर आमिष दाखवून अत्याचार 
त्यानंतर तो नांदगावपेठ हद्दीतून गाडगेनगर हद्दीत सरस्वतीनगर येथे तिसऱ्या पत्नीसोबत भाड्याच्या खोलीत राहू लागला. आता तिसऱ्या पत्नीनेही मोरेश्वरविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली. त्यात तिने तो काही दिवसांपासून बेपत्ता असून, त्याने आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केला असा, आरोप केला आहे. त्यामुळे तिसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून मोरेश्वर भाकरेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.

नवरा झाला पसार 
तिघींनी तक्रारी दिल्यामुळे एकापाठोपाठ एक मोरेश्वर भाकरे विरुद्ध गुन्हे दाखल झाले. दोन गुन्ह्यांत त्याला अटकही झाली होती. परंतु तिस-या पत्नीच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच तो पसार झाला. 
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक गाडगेनगर ठाणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com