सांड पकडताना फुटला घाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील 5 मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात पाठविले. मात्र, सांडांना नियंत्रणात आणताना तमिळनाडूच्या पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. भरचौकात सांड पकडताना पथकातील कर्मचाऱ्यांना घाम फुटलाच, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांतही भीती निर्माण झाली तर काही नागरिकांचे चांगलेच मनोरंजनही झाले. 

नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील 5 मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात पाठविले. मात्र, सांडांना नियंत्रणात आणताना तमिळनाडूच्या पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. भरचौकात सांड पकडताना पथकातील कर्मचाऱ्यांना घाम फुटलाच, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांतही भीती निर्माण झाली तर काही नागरिकांचे चांगलेच मनोरंजनही झाले. 
महापालिकेने रस्त्यांवरील मोकाट गायी, सांडांविरोधात मंगळवारपासून कारवाईस सुरुवात केली. मंगळवारी महापालिकेने तमिळनाडूवरून बोलावल्या पथकाने सांड व गायींसह 22 जनावरे कोंडवाड्यात नेली. आज महापालिकेच्या पथकाने सक्करदरा, दिघोरी व ताजबाग परिसरात सांड पकडण्याची मोहीम राबविली. सक्करदरा येथे मोकाट सांडाला नियंत्रणात आणताना पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम गाळावा लागला. चौकातील सांड दिसून येताच, पथकातील कर्मचाऱ्यांना दोराने त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सांड पळ काढत असल्याने त्यांच्या मागे धावावे लागले. त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारकांचीही पाचावर धारण बसली. अखेर दोन कर्मचाऱ्यांना दोराचा सापळा रचून सांडाला पकडले. मात्र, सांडाच्या बळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. अखेर दोघांनी दोराने त्याला पकडल्यानंतर कोंडवाडा विभागाच्या वाहनात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, सांडाने हा प्रयत्नही हाणून पाडत ट्रॅक्‍टरवर उडी घेतली. परिणामी पथकातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर दोघाने पकडल्यानंतर तिसऱ्याने वेसण घातली व सांडाला कोंडवाडा विभागाच्या वाहनात डांबले. मात्र, जवळपास दीड ते दोन तास कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. सांडाचा रुद्रावतार बघण्यासाठी यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली. त्यानंतर ताजबाग व दिघोरी परिसरातील रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडण्यात आली. मात्र, एकाच सांडाने घाम काढल्याने कर्मचारीही थकल्याने कारवाई थांबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कोंडवाडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी कारवाईदरम्यान पोलिस पथकासह मदत केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: street animal taken into custody