आंजी (मोठी) येथे तणाव; डॉक्‍टरला अटक

आंजी (मोठी) : बसस्थानक चौकात निषेधाकरिता एकत्र आलेले नागरिक आणि पोलिस बंदोबस्त.
आंजी (मोठी) : बसस्थानक चौकात निषेधाकरिता एकत्र आलेले नागरिक आणि पोलिस बंदोबस्त.

आंजी मोठी (जि. वर्धा) : एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकद्वारे प्रसारित करण्याच्या प्रकरणाने बुधवारी (ता. 21) आंजी मोठी गावात तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद नजीकच्या खरांगणा (मोरांगणा) गावातही पडले. या प्रकरणी खरांगणा पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकणारे डॉ. रविदत्त कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
डॉ. रविदत्त कांबळे यांचे बाजारचौकात खासगी क्‍लिनिक आहे. त्यांनी मंगळवारी (ता. 20) आपल्या फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट धर्माविषयी काही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. हा मजकूर वाचण्यात आल्यावर बुधवारी (ता. 21) सकाळपासूनच तणावाचे वातावरण तयार होऊ लागले. तणाव वाढू नये, यासाठी ठाणेदार संजय गायकवाड यांनी बाजार चौकात पोलिस बंदोबस्त लावला. वर्धा येथून दंगल नियंत्रण पथक, अधिकची पोलिस कुमक बोलाविण्यात आली. या घटनेचा निषेध करण्याकरिता भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील गफाट, राम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मनोज गुप्ता, सरपंच जगदीश संचारिया यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शाळा-महाविद्यालये, बाजारपेठ, रुग्णालय बंद करण्यात आले. बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी ठाणेदार गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, संतप्त मोर्चेकऱ्यांनी डॉ. कांबळे यांच्या क्‍लिनिकचे शटर तोडून तेथील काचा फोडल्या व इतर साहित्याची मोडतोड केली. मोर्चेकऱ्यांनी डॉ. कांबळे यांचा प्रतीकात्मक पुतळाही दहनासाठी सोबत आणला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हा पुतळा ताब्यात घेतला.
दरम्यान, विश्‍व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख अटल पांडे यांनी गावाला भेट दिली. त्यांनी गावात ठिकठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली, तसेच ठाणेदार संजय गायकवाड यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.
खरांगण्यातही बंद
या घटनेविषयी माहिती मिळाल्यावर खरांगणा (मोरांगणा) येथेही पडसाद उमटले. धार्मिक भावना दुखावलेल्या नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. या दरम्यान, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. खरांगण्याच्या ठाणेदारांना निवेदन सादर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com