चिंध्या पांघरून सोनं विकतात गंगाबाई!

प्रमोद काळबांडे 
Sunday, 3 November 2019

या आहेत गंगाबाई. पूर्ण नाव गंगाबाई विठोबा रोहणकर. मागे दिसते ती त्यांची तट्ट्यांची झोपडी. त्यांनी घातलेले कपडे मळकटलेले. पण, त्या सोनं विकतात. होय सोनं! तुम्हाला खरं वाटणार नाही; परंतु त्या खरंखुरं सोनं विकतात. याला-त्याला नव्हे, तर चक्क सोनाराला. होय, सोनं विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या सोनाराला. 

नागपूर : गंगाबाई नागपूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड या तालुक्‍याच्या ठिकाणी राहतात. ज्या वस्तीत त्या राहतात, त्या वस्तीचे नाव "सोनेझरी'. म्हणजे नावातही सोने शब्द. परंतु, उमरेडमधील ही अत्यंत गरीब वस्ती आहे. वंचितांची वस्ती. अनेक समाजांचे लोक येथे राहतात. भोई समाजाचे म्हणजे मासेमारी करणारे. लोहार समाजाचे म्हणजे लोहार काम करणारे. धोबी समाजाचे म्हणजे घाटावर कपडे धुणारे. ते सर्व गुण्यागोविंदानं राहतात. गंगाबाई यांचीही याच वस्तीत एक झोपडी आहे. त्या सोनेझरी समाजाच्या आणि त्या सोनं विकण्याचं काम करतात. 

दुपारी या वस्तीत गेलो, तेव्हा गंगाबाई ऐरणीवर बसलेल्या दिसल्या. "ऐरणीच्या देवा तुला ठिगणी ठिणगी वाहू दे' हे लतादीदीनं गायिलेलं आणि "आनंदघन' या टोपणनावानं संगीतबद्ध केलेलं गाण ऐकलं होतं. परंतु, इकडे विदर्भात गावातील खाती समाज किंवा लोहार समाजाचे लोक याला ऐरणी म्हणत नाहीत तर भातं म्हणतात, असं माहीत होतं. तर, गंगाबाई त्यावर काम करत होत्या. त्यांना विचारलं, ""तुम्ही काय करता?'' तर, त्यांनी ""सोनं झारतो जी म्या'', असं मोठ्या कष्टानं मान वर करून उत्तर दिलं आणि त्या पुन्हा मान खाली खुपसून पुन्हा कामाला लागल्या. त्यांना बिझी पाहून मग मी याच वस्तीतील उत्तम सर्जेराव रोहणकर यांना विचारलं, ""सोनं झारनं म्हणजे काय बा?'' 

उत्तमराव मग सांगू लागले, ""आमी सारे सोनझरी समाजाचे आहो. आमचं पूर्वापार काम सोनं झारनं हाये. सोनं झारनं म्हणजे कचऱ्यातून सोनं काढनं.'' ""कचऱ्यातून तुम्ही कसं सोनं काढता?'' मी आश्‍चर्यानं विचारलं, तेव्हा उत्तमराव हसून सांगू लागले, ""सोनारकाम जिथं जिथं चालते, म्हणजे सोनाराच्या दुकानात जिथं सोनं-चांदी गलाईचं काम चालते, दागिने बनविण्याचं काम चालते, त्या दुकानाच्या म्होरून आम्ही गागरा उचलतो. गागरा म्हणजे मातीची धूळ.

भोवतालच्या नालीतून गाटा काढतो. गाटा म्हणजे चिखल. मंग थो गागरा आणि गाटा साफसूफ करतो. त्यातून काही धातू निघते. त्याची गलाई करून मंग जे जे मटेरियल निंघन ते काढतो. मंग त्यात कव्हा कव्हा चांदी निघते. सोनंबी निंघते. पन थे थोडूकसंच असते. बाकी बी धातू निंघते.'' उत्तमराव सांगत होते. मग मी गंगाबाईकडे वळलो. त्यांना विचारू लागलो. आता त्यांचं काम आटोपतं आलं होतं. मग विचारलेल्या प्रश्‍नांचं त्या उत्तर देऊ लागल्या- 
मी : कुठून आन्ता तुमी हे? 
गंगाबाई : आंगनातून. 
मी : अच्छा, सोनाराच्या आंगनातून. बरं मंग सोनं कसं काढता तुमी? 
गंगाबाई : याच्यातून गलवतो सोनं-चांदी. 
मी : किती निंघते सोनं? 
गंगाबाई : निंघते दोनतीनशे मिली. 

गंगाबाई थोडं बोलल्या. पुन्हा कामात लागल्या. सोनं गलवण्याचं त्यांचं अखेरच्या टप्प्यातील काम सुरू होतं. आमच्यासमोर मग एका गंजात चांदीमिश्रित सोनं आणि त्यात काही धातू त्यांनी टाकल्याचं दिसलं. 

No photo description available.
गंगाबाईंनी गागऱ्यातून काढलेली धातू. यात चांदी आणि सोन्याचा जरासा अंश आहे.

"गंगाबाईसारख्या लय बाया झारतात सोनं' 
उत्तमरावचे भाऊ रामू सर्जेराव चव्हाण यांनी मग उरली-सुरली कथा सांगितली. ""गंगाबाईसारख्या लय बायाले सोनं झारता येते. इथून भेटलेली चांदी असो का सोनं, थे आमी मग सोनाराले विकतो. तेच्यावर आमचं पोट चालतं. सोनेझरी वस्तीतले आमच्या समाजाचे सारेच लोक हेच काम करे अगूदर. पनं आता सिमेंटचे रस्ते झाले. आता गागराबी नायी भेटत जास्त. पापुलेशनबी वाढलं. मंग खायचे तोंडबी जादा झाले घरात. मंग आता आमी दुसरे बी कामं करतो. हातजमुरीले जातो. लोहा-लोखंड बी येचाले जातो.'' 
 

Image may contain: 10 people, people smiling, people standing, child and outdoor
गंगाबाईंच्या सोनेझरी वस्तीतील मुली. पुढे यांचीही "गंगाबाई'च होणार.

"गंगाबाई' होणे हेच प्रत्येक मुलीचे प्राक्तन 
""म्या तिसरा वर्ग शिकली आहे'', असे गंगाबाई म्हणाल्या. येथे ही वस्ती वसून चाळीसएक वर्षे झाली. येथील महिला आणि मुलींची कशी स्थिती असेल याचे अत्यंत प्रातिनिधिक आणि बोलके उदाहरण म्हणजे गंगाबाई. त्यांच्या वयाच्या बाया एक तर शाळेतच गेल्या नाहीत किंवा चार-दोन दिवस गेल्या. येथील काही मुली शाळेत जाताना दिसतात. परंतु, सध्याच्या स्थितीत पाचव्या इयत्तेपुढे एकही मुलगी शिकलेली नाही. मनीषा अनिल रोहणकर, राधा संदीप रोहणकर आणि साक्षी जय रोहणकर या तिघी पाचवीत आहेत. तर, रिंकी विनोद रोहणकर चौथ्या इयत्तेत.

पंडित नेहरू उच्च प्राथमिक शाळा आणि अशोक कन्या विद्यालयात काही मुली जातात. परंतु, त्यांचीही गळती निश्‍चितच आहे. पुढे कमी वयात त्यांचे लग्न होऊन संसाराचे ओझे पेलावे लागणार. मग संसार चालवायला काम करावे लागणार. लोहा-लोखंड-भंगार गोळा करायला जावे लागणार. गंगाबाईसारखेच गागरा आणि गाटा आणून सोनं झारन्याचं काम करावं लागणार. येथील प्रत्येक मुलीचे आयुष्य गंगाबाईसारखेच होणार, हे त्यांचे अटळ प्राक्तन आहे, यात शंकाच नाही. 

सोनं पांघरण्याचा प्रवास कधी? 
सुप्रसिद्ध महाकवी सुधाकर गायधनी यांची कविता आहे- 
आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिऱ्हाईक फिरकेना 
सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिऱ्हाईक पेलता पेलवेना 

चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलेल्या अशा असंख्य गंगाबाई आहेत. उत्तम आणि रामू सर्जेराव रोहणकर या बंधुद्वयाकडे अनुसूचित जमाती अर्थात "एसटी' प्रवर्गाचे प्रमाणपत्र आहे. नागपूर येथे असलेल्या आदिवासी विकास विभाग कार्यालयाने ठरविले तर इथल्या मुलींचा शिक्षणरूपी सोने पांघरण्याचा प्रवास सुरू होऊ शकतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strory of a woman named Ganagabai sale Gold at Nagpur