शिकवणीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

यवतमाळ : शिकवणीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचे दुचाकीस्वारांनी अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (ता.15) सकाळी अकराला येथील शिवाजी गार्डनजवळील परिसरात घडली. याबाबत पालकांना माहिती मिळताच त्यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. हर्ष ईश्वर नचवाणी (वय 17, रा. सिंधी कॉलनी, यवतमाळ) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

तो गोधनी मार्गावर असलेल्या एका महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील सायकल व्यावसायिक आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे हर्ष दुचाकीने शिवाजी गार्डन परिसरात असलेल्या शिकवणीवर्गाला गेला होता. दुचाकीवर आलेल्या अनोळखी तरुणांनी त्याचे अपहरण केले. घटनास्थळी त्याची दुचाकी पडून राहिल्याने या घटनेला वाचा फुटली. अपहरणाची वार्ता सिंधी कॉलनीत पसरताच हर्षच्या पालकांसह नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. तेथून अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वच पोलिस पथकांनी विद्यार्थ्याचा शोध सुरू केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. वृत्तलिहिस्तोवर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता.
50 लाखांच्या खंडणीची मागणी
विद्यार्थ्याचे अपहरण करून हर्षला जंगलात नेल्याचा अंदाज आहे. तेथून व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एक तासात पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, अशी चर्चा पोलिस वर्तुळात ऐकायला मिळाली. "पप्पा, अपहरणकर्त्यांना 50 लाख रुपये द्या, नाही तर ते मला जिवाने मारून टाकतील', असे विद्यार्थी व्हिडिओ कॉलमध्ये बोलत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student abducted for teaching