‘का कळेना...हा दुरावा...! यात हरविली शाळेतली पाखरे’; का झाले असे...वाचा

विरेंद्रसिंह राजपूत
Sunday, 19 April 2020

ऐन विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ यात लॉकडाउन झाला असून, आजपर्यंतच्या इतिहासात असे घडल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सद्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू असल्यामुळे जवळपास एका महिन्यापासून सर्वच शाळा बंद आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या आधिच परीक्षा रद्द केल्यानंतर नववी व अकरावीच्या परीक्षाही होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षांपासून मुकावे लागले आहे. अंगणवाडीही बंद असल्याने एकप्रकारे चिमुकल्यांना कोरोना काय व त्यामुळे नेमके काय झाले हे कळेनासे झाले असून, शाळेतील ही चिमुकली पाखरे शाळेपासून हिरावली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीने घरातून बाहेर पडण्याची मनाई असल्याने सांघिक खेळापासून पण त्यांना मुकावे लागत आहे.

कोरोना संसर्गाचा वाढता फैलाव लक्षात घेता अगोदर 21 दिवसाचा तर आता 14 एप्रिलपासून 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे ऐन विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ यात लॉकडाउन झाला असून, आजपर्यंतच्या इतिहासात असे घडल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यानाही त्याचा फटका बसला असून, त्यांना तर नेमका कोरोना काय व यापासून होते काय याची साधी कल्पना नाही. त्यामुळे त्यांना खेळालाही मिळत नसल्याने घुमसट झाली आहे. एकप्रकारे शिक्षक व विद्यार्थ्यांचा दुरावा ऐन परीक्षाकाळात झाल्याने ‘का कळेना...हा दुरावा’...अशी अवस्था झाल्याने ही चिमुकली पाखरे शाळेपासूनच हिरावली गेली आहे.

आवश्यक वाचा - अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला 'मुळशी पॅटर्न'

अशाही परिस्थितीत अनेक शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाळ जुडवत अभ्यासाशी जुळवून घेतले असताना क्रीडा प्रकार किंवा सांघिक खेळांपासून चिमुकल्यासह सर्वच विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहे. त्यामुळे ऐन खेळण्या बागळण्याच्या दिवसात कोरोनाने सर्वानाच घरात बंद करून टाकल्याने त्यांच्या सर्व प्रकारच्या आनंदावर विरजण पडले आहे. कोरोना किती दिवस चालेल व पुढचे येणारे शैक्षणिक सत्र कसे असेल याबाबतही सद्या साशंकता असून, शाळेतील हा शिक्षकांसोबतचा व मित्रांसोबतच दुरावा किती दिवस चालेल. हे न कळणारे कोडे ठरले आहे.

सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम
सद्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सॲप नंबर घेऊन तुकडीनुसार मोबाईल ग्रुप बनवून विद्यार्थ्यांना रोजचा अभ्यासक्रम देत त्यांच्याकडून अभ्यासासोबतच इतर सामाजिक उपक्रमाबाबत उपकृत करत आहोत. तसेच यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता चित्रकला व नवनवीन उपक्रम बनविण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करीत आहोत. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दुरावा असला तरी आजही सर्व शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यासोबत जोडले गेले आहेत.
-की. वा. पाटील, मुख्याध्यापक, मराठी उच्च प्राथमिक शाळा, टाकरखेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student exam period lockdown