video : एका "क्‍लासरूम'चे चिमुकले आंदोलन

प्रमोद काळबांडे 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकवले जात नाही 
  • अत्यंत देखणी आणि सुसज्ज खोली 
  • संगणकाचे ज्ञान असलेला पूर्ण वेळ शिक्षक दिलेला नाही 
  • मुख्याध्यापकाच्या नावाने लिहिला अर्ज 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेची जयताळा येथील एक शाळा. "सरकारी शाळा वाचवा आणि त्या सर्वोत्तम करा' या अभियानातील कार्यकर्ते या शाळेत पोहोचले. तिथली एक आठवीची "क्‍लासरूम'. छान-छान विद्यार्थी मज्जा करत बसलेले. त्यांनी एका स्वरात गाणे म्हणून दाखविले. कविताही म्हटली. "तुम्हाला काय आवडते तुमच्या शाळेतले?' असे विचारताच "सगळंच आवडतं' असे लाजत उत्तर दिले. "आणि तुम्हाला काय नाही आवडत?' असे विचारताच "आम्हाला लायब्ररीत जाऊ नाही देत, कॉम्प्युटरवर नाही शिकवत', असे ठाम उत्तर दिले आणि इथेच एका चिमुकल्या आंदोलनाचा जन्म झाला. 

जयताळा हा तसा नागपूर शहरातील मध्यमवर्गीय आणि कामगार लोकांचा "एरिया'. एकीकडे नागपूर शहरातील अनेक शाळा धडाधड बंद होत असताना, इथली शाळा मात्र विद्यार्थ्यांनी फुललेली दिसली. विस्तीर्ण पटांगण, परंतु जुनी इमारत. वर्गखोल्या मात्र स्वच्छ. वर्गातील डेस्क-बेंच जुने झालेले. त्यावरील "सनमायका' चारी कोपऱ्यांतून तुटलेला. त्यामुळे आणखीच जुनाट वाटत होते. परंतु, विद्यार्थ्यांचे चेहरे मात्र अत्यंत प्रफुल्लित आणि अगदी ताजेतवाने होते. 

आंदोलनाची तयारी अशी सुरू झाली

नागपूर शहरातील अत्यंत अभ्यासू आणि विकासाचा ध्यास घेतलेले कॉंग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी खरे तर ही "शाळा वाचवा' अभियानाची मंडळी आली होती. प्रफुल्लभाऊंकडून अनेक मुद्द्यांवर भरपूर चर्चा झाली. भाजपचे तत्कालीन नगरसेवक गोपाल बोहरे यांनी "मनपा'चे शिक्षण सभापती असताना "मनपा'च्या शाळा उत्तम करण्याचे एक "व्हिजन' घेऊन काम केले. त्यांचाही उल्लेख चर्चेत निघाला. प्रफुल्लभाऊंनी मग त्यांच्या प्रभागातील त्यांच्या प्रयत्नातून वाढविलेली आणि महत्त्वाचे म्हणजे बंद न पडू दिलेली शाळा दाखविली. शाळा परिसरातच प्रफुल्लभाऊंच्या प्रयत्नांतून "डिजिटल रूम' साकारली आहे. अत्यंत देखणी आणि सुसज्ज खोली पाहून अनेकांना दिल्लीतील क्‍लासरूम आठवल्या. मुळातच प्रसिद्धिपराङ्‌मुख असलेले प्रफुल्ल गुडथे यांनी एक "मॉडेल डिजिटल रूम' साकारूनही कुणीही फारशी दखल घेतली नाही. ही "रूम' पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी शाळेतून एक फेरफटका मारला. त्या वेळी अचानक आठवीच्या वर्गात "एंट्री' केली आणि मग इथून एका "चिमुकल्या' आंदोलनाची तयारी सुरू झाली. 

एक आयडिया सुचली अन्‌...

इथल्या चिमुकल्यांसोबत चर्चा केल्यावर एक लक्षात आले, ते हे की, इथली सर्वच बालके श्रमिक कुटुंबांतील आहेत. साक्षीचे वडील फर्निचरचे काम करतात, तर आई गार्डनमध्ये कामाला जाते. समीक्षाचे बाबा पेंटर आहेत, तर आई होमपेशंट सांभाळून कुटुंबाचा भार उचलते. यशश्रीचे बाबा "मेकॅनिक' आहेत, तर आई हातमजुरीला जाते. हीच घर-घर की कहाणी.

क्लिक करा - ई सकाळ अॅप डाऊनलोड करा

नागपूर विद्यापीठातील एका साहित्यिक प्राध्यापक मुलाने आपल्या शेतकरी बाबाची ओळख लपविल्याचे उदाहरण या शहराने ऐकले आहे. परंतु, इथल्या कोणत्याही बालकाच्या चेहऱ्यावर आपल्या आईवडिलांचा व्यवसाय सांगताना मुळीच लाज दिसली नाही. मोफत शिक्षण असल्यामुळे ही बालके इथे शिकू तरी शकतात. नागपूर शहरातील अनेक शाळा विविध कारणे दाखवून बंद केल्या असताना, या शाळेने मात्र एक पिढी घडविण्याचा वसा अजून सोडलेला नाही, हे पाहून "सरकारी शाळा वाचवा' अभियानाचे कार्यकर्ते मनोमन सुखावले. परंतु, याच आवारात "डिजिटल रूम' असूनही आठवीच्या बालकांना कॉम्प्युटर शिकविले जात नाही, हे ऐकून खंतही वाटली. मग एक "आयडिया' सुचली आणि ती लगेच या चिमुकल्यांना सुचविली. 

Image may contain: 13 people, people smiling, people standing
विद्यार्थ्यांकडून निवेदन स्वीकारताना प्रफुल्ल गुडधे

आंदोलनाने गाठली यशाची पहिली पायरी

ही चिमुकली मुलं धडाधड कामाला लागली. मुख्याध्यापकाच्या नावाने एक अर्ज लिहिला. "मा. वर्गशिक्षिका तऱ्हाणे मॅडम, आम्हाला रोज कॉम्प्युटर शिकवावे.' लिहून होताच मानसी, साक्षी, शुभांगी, समीक्षा, दीपांजली, पूजा, प्रगती, हर्ष, करण, नमन, सोमोश, रोहित, शिवम, प्रतीक्षा, यश यांनी जणू "ऑटोग्राफ' द्यावा या थाटात स्वाक्षरीही करून टाकल्या. मग सर्व रांगेने वर्गखोल्यांच्या बाहेर आले. मुख्याध्यापक सुभाष उपासे आणि प्रफुल्लभाऊ गुडधे बाहेर उभेच होते. त्यांना लिहिलेला अर्ज सोपवला. तसा हा प्रयोग नवीन असल्यामुळे बाहेर उभे असलेले कार्यकर्ते आणि सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला.

No photo description available.

जरा कुतूहलही वाटले. एक आठवड्यात सर्व बालकांचा "टाइमटेबल' बनवून रोज एक "कॉम्प्युटर पिरियड' ठेवण्यात येईल, असे सांगितले. मग सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. एका छोट्याशा क्‍लासरूममध्ये जन्म घेतलेल्या एका चिमुकल्या आंदोलनाला पहिले यश मिळाल्याचे समाधानच क्‍लासरूमध्ये परतताना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. 

नगरसेवकांचे थेट चिमुकल्यांना आश्‍वासन 
"डिजिटल रूम' सुरू केली. परंतु, महानगरपालिकेने अजूनही संगणकाचे ज्ञान असलेला पूर्ण वेळ कर्मचारी शिक्षक दिलेला नाही. त्यामुळे सुसज्ज "कॉम्प्युटर रूम' असूनही शाळेतील विद्यार्थ्यांना "कॉम्प्युटर' शिकता येत नाही. याविषयी आधीच मागणी केली आहे. परंतु, आता तत्काळ पाठपुरावा करतो. 
- प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक

शिक्षणाधिकाऱ्यांना चिमुकल्यांसाठी गळ 
या शाळेतून शिकून मोठे झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी या शाळेकडे "पे बॅक टू सोसायटी' भावनेने मदत करावी. तसेच नागपूर महानगपालिकेच्या शिक्षणधिकारी प्रीती मिश्रीकोटकर मॅडम अत्यंत कृतिशील आहेत. त्यांनी नागपूर शहरातील "मनपा'च्या सर्व शाळांमध्ये संगणक शिक्षणाची सोय उपलब्ध करून शिक्षकही दिले पाहिजे. 
- अंकुश बुरंगे, 
"यशदा'चे ट्रेनर आणि सामाजिक कार्यकर्ते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student says, Teach us a computer