सावधान, चिमुकल्यांचा जीव गुदमरतोय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

पालकांनी निवडलेली चिमुकल्यांची वाहतूक कितपत सुरक्षित आहे, याची चिंता कुणालाच नसल्याचे दिसते.

बुटीबोरी - नुकतीच शाळांना सुरुवात झाली. परंतु, शाळेत जाण्यासाठी पालकांनी निवडलेली चिमुकल्यांची वाहतूक कितपत सुरक्षित आहे, याची चिंता कुणालाच नसल्याचे दिसते. ज्या वाहनांतून मुले प्रवास करतात त्यात क्षमताबाह्य विद्यार्थी कोंबले जातात. मात्र, वाहतूक विभाग धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प बसला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे पालकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. मात्र, पालकही बेफिकीर असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

बुटीबोरी शहराची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा अधिक आहे. घरापासून शाळेचे अंतर दूर असल्याने मुलांसाठी वाहनाने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पोलिस प्रशासनाच्या नजरेआड सकाळी आणि मुलांना सुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेली वाहने वेगाने धावतात. शहरातील मोठ्या रस्त्यांवरील शाळांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनानेदेखील सूचना द्याव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळा सुटण्यापूर्वी वाहनचालक शाळेच्या बाहेर येऊन थांबतात. यामुळे विद्यार्थी वाहनात बसण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. शाळाचालकांनी रिक्षांना शाळेच्या मैदानात पार्किंगसाठी सोय करावी, अशी मागणी आहे.

शहर व परिसरातील सुमारे १५ पेक्षा अधिक प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे. नियमानुसार विद्यार्थी वाहतूक केल्यास आर्थिक गणित जुळत नसल्याचा दावा केला जातो. एका फेरीत व्हॅनमध्ये क्षमताबाह्य विद्यार्थ्यांची एकावेळी वाहतूक केली जाते. शाळेपासून घराच्या अंतरापर्यंत आकारण्यात येणारे भाडे जास्तीत जास्त गोळा व्हावे म्हणून वाहतूक परवान्याच्या नियमांकडे कानाडोळा केला जातो. 

मारुती व्हॅनसारख्या वाहनातून १५ ते २० विद्यार्थ्यांची खुराड्यासारखे कोंबून वाहतूक केली जाते. बहुतांश विद्यार्थ्यांचे हात-पाय वाहनाबाहेर निघालेले असतात. चालकालाही बसायला पुरेशी जागा नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात असतो. यापैकी बहुतांश वाहनचालकांकडे वाहतूक विभागाचा परवानादेखील नसल्याची चर्चा आहे. सुरक्षिततेचा विचार करून पालकांनी पाल्याला स्कूलबसनेच प्रवास करता येईल, त्यासाठी आग्रही असावे. मात्र, तसे न करता बहुतांश पालक हे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा वापर करतात. व्हॅनचे दार मधोमध असते. त्यामुळे मुलांना गाडीत चढताना पाय उंच करावा लागतो. त्यामुळे ते घसरून पडण्याचा धोका असतो. व्हॅनच्या दाराला ‘लॉक’ लावलेले नसेल तर दार कधीही उघडू शकते. व्हॅनमध्ये घरगुती गॅसचा वापर होत असेल आणि निकृष्ट गॅस किट वापरले असेल तर ते जीवघेणेच ठरू शकते. हा विषय अतिशय गंभीर असून याकडे संबंधित विभाग लक्ष देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student school bus transport