परीक्षेच्या भीतीपोटी घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

सध्या परीक्षेचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि परीक्षेची धास्ती मनात घेतली आहे. त्याच कारणामुळे अनेक विद्यार्थी नैराश्‍यात जात आहेत. पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागपूर - सध्या परीक्षेचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि परीक्षेची धास्ती मनात घेतली आहे. त्याच कारणामुळे अनेक विद्यार्थी नैराश्‍यात जात आहेत. अभ्यास पूर्ण न झाल्याने नापास होण्याच्या भीतीपोटी निकिता संजय पाटील (वय २४, रा. बॅनर्जी ले-आउट, अजनी) या पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

निकिता पाटील ही पॉलिटेक्‍निकच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे अंतिम वर्षाचे काही विषय बॅक आहेत. बॅक विषयाचे पेपर आणि आणि अंतिम सेमिस्टरचे पेपर सुरू आहेत. मात्र, निकिताचा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. ती रात्रंदिवस अभ्यास करीत होती. परंतु, अभ्यासक्रम मोठा असल्यामुळे पूर्ण झाला नव्हता. निकिता ही बुधवारी दुपारी एकटीच घरी होती. तिचे आईवडील नंदनवनमधील एका नातेवाइकाच्या लग्नसमारंभाला गेले होते. ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यामुळे तिच्या वागण्यातही फरक जाणवत होता. तिने बेडरूममध्ये सीलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

निकिताचा १६ एप्रिलला बॅक विषयाचा पेपर होता. मात्र, अभ्यास न झाल्यामुळे तिने पेपर दिला नव्हता. १८ एप्रिलला पुन्हा एक पेपर होता. परंतु, अभ्यास न झाल्यामुळे १७ एप्रिललाच तिने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. 

दादा, तू जेवण करून घे..!
मोठा भाऊ संकेत हा बाहेर गेला होता. तो दुपारी घरी जेवायला आला होता. ‘दादा, तू जेवण करून घे... तुला वाढून देते,’ असे म्हणून निकिताने संकेतला जेवण दिले. त्याचे जेवण झाल्यानंतर स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन आत्महत्या केली, अशी माहिती अजनी पोलिसांनी दिली.

Web Title: student suicide in nagpur