सावधान...विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक कराल तर खबरदार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

विद्यार्थांची वाहतूक करणारे वाहने रडारवर असून,  एकाच आठवड्यात 34 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

अकोला : अनधिकृत स्कूल व्हॅन, बसेसवर व ऑटोरिक्षा तसेच खाजगी वाहनातून होणारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक करणारे वाहने आरटीओ विभागाच्या रडारवर असून, तपासणी मोहिमेत एकाच आठवड्यात ३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

शालेय विद्यर्थ्यांची अनधिकृत स्कूल व्हॅनद्वारे वाहतूक होत असल्याने स्कूल बस वाहतूक नियमावलीचे अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष मोहीम दरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या मोटार सायकलची तपासणी करण्यात येत असूनयावेळी आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्यास अथवा चालक तसेच सहप्रवाशी/विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे निदर्शनास आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल. ऑटोरिक्षानी मीटरप्रमाणे भाडे आकारणे, शेअर रिक्षा मार्गावर अथवा प्रिपेड मार्गावर मंजूर भाडे आकारणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात आली नाही. तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांविरुद्ध, शालेय विद्यार्थ्यांची कंत्राटी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल. तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. विहीत परवान्याशिवाय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. आसनक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध स्कुलबस नियमावलीतील तरतुदीचा भंग करुन चालणाऱ्या परवानाधारक स्कूल व्हॅन/बसेस वर कडक कारवाई करण्यात येत आहे.

एकाच आठवड्यात 34 वाहनांवर कारवाई
शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीच्या माध्यमातून विद्यार्थांची वाहतूक केल्या जाते. त्यात शाळांच्या मालकीच्या स्कूलबसही मागे नाहीत. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थांना कोंबून नेल्या जाते. तसेच ही वाहने आरटीओच्या नियमानुसार फिट असणे आवश्यक आहेत. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करून शहरात बिनदिक्कतपणे अवैध वाहनांतून विद्यार्थांना ने-आण होत असल्याने त्याकडे पोलिस आणि आरटीओंचा कानाडोळा असतो. आरटीओ कार्यालयाने शहरातील स्कूलबस व खासगी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली असून, एकाच आठवड्यात ३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

Image may contain: outdoor

जिल्ह्यात 256 स्कूल बस
उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नोंदणीकृत २५६ स्कूल बस आहेत. या स्कूलबसचीही नियमीत तपासणी केली जात आहे. मात्र, आता जी वाहने विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत अशा सगळ्या वाहनांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकर यांनी दिली.

ऑटोरिक्षातून प्रवास करण्यास मनाई
उच्च न्यायालयाने ऑटोरिक्षामधून विद्याथ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने पालक त्यांच्या पाल्यांना ॲटोरिक्षामधून प्रवास करण्यास मनाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
. समाजसेवक, सेवाभावी संस्थानी राज्य शासनास सुरक्षाविषयक तरतुदी असलेल्या बसेस, वाहने माफक दरात विद्यार्थी वाहतुकीसाठी पुरविण्यास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student transport vehicles on the radar