विद्यार्थ्यांनी केले ईव्हीएमवर मतदान

संदीप रायपुरे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

प्रेरणादायी अनुभव...
विद्यार्थ्यांना आपल्या निवडणूक प्रकियेची माहिती व्हावी या हेतूने सहशिक्षक मनोज साबळे आणि मला ही संकल्पना सुचली आणि आम्ही ती प्रत्यक्षात राबविली. हा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरला.
- प्रमोद एकोणकार, शिक्षक
 

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : 
निवडणुकांची तारीख जाहीर झाली. आपापल्या गटांकडून उमेदवार उभे केले गेले. दणकेबाज प्रचार करण्यात आला. निवडणुकीची प्रक्रिया सर्वांना समजावी आणि निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जागृतीही झाली. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस उजाडला आणि इव्हीएम मशीनवर मतदान पार पडले. निकाल लागला अन् एकच जल्लोष झाला. गुलालाच्या उधळणीत नवा मुख्यमंत्री निवडला गेला...

हे वर्णन वाचून मुदतपूर्व निवडणुका झाल्या की काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. अशी साग्रसंगीत निवडणूक झाली ती चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली येथील जिल्हा परिषद शाळेत. मोबाईल ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचा धडा गिरवला.

जिल्हा परिषद शाळा स्तरावर शालेय मंत्रिमंडळाची निवडणुक घेतली जाते. हात वर करून विद्यार्थी आपले नेते निवडतात. यात आता बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना ईव्हीएमव्दारे होत असलेल्या निवडणुक प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने एकोणकर आणि साबळे या शिक्षकांनी मोबाईलमध्ये ईव्हीएमव्दारे मतदान घेण्याची संकल्पना मांडली. शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्यध्यापकांसह सर्वांनी यास होकार दिला.
अन् मग सुरू झाली शालेय मंत्रिमंडळाच्या इलेक्शनची तयारी. सुरुवातीला मोबाईलच्या माध्यमातून ईव्हीएम मतदानाचे  अॅप डाउनलोड करण्यात आले.

यानंतर एक बॅलेट आणि एक कन्ट्रोल युनिट तयार करण्यात आले. शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि इतर मंत्र्यांचा समावेश असतो. या पदासाठी होत असलेल्या मतदान प्रकियेसंदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मग काय इच्छुक विद्यार्थ्यांनी आपापले नामांकन अर्ज सादर केले. सुट्टयांच्या दिवसात त्यांना प्रचार करण्याची संधी देण्यात आली.तीन दिवसांत विद्यार्थ्यांनी नेत्यांनाही लाजवतील, असे प्रचाराचे फंडे वापरले.

प्रत्यक्षात मतदानाचा दिवस उजाडला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष हिंगाणे, मुख्याध्यापक वकील रामटेके यांनी निवडणुक मतदान अधिकारी म्हणून का पाहिले. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मनोहर आत्राम आणि हिरामण सिडाम या शिक्षकांवर देण्यात आली. तर, मतमोजणी अधिकारी म्हणून प्रमोद एकोणकर आणि मनोज साबळे हे उपस्थित होते. यानंतर बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली.

विद्यार्थी मतदारांनी हिरीरीने आपआपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर बटन दाबत मतदान केले. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्यांनतर निवडणुक मतदान अधिकाऱ्यांनी  मोबाईल ईव्हीएमव्दारे झालेले मतदान घोषित करीत मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाकरिता आचल कुमरे आणि पियुष कोहपरे हे आमने-सामने होते. निवडणुकीत एकूण 68 मतदारांनी आपला हक्क बजावला.

त्यात आचल कूमरेला 37 मते मिळाली तर, पियुष कोहपरे याला 31 मते मिळाली. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आचलला विजयी घोषित करताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. याच पध्दतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत इतर मंत्र्यांचीही निवड करण्यात आली.
शाळेत पार पडलेल्या या आगळयावेगळया निवडणुकीने गावातही निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते. या लई भारी इलेक्शनची चांगलीच चर्चा आता गावात रंगली आहे.

प्रेरणादायी अनुभव...
विद्यार्थ्यांना आपल्या निवडणूक प्रकियेची माहिती व्हावी या हेतूने सहशिक्षक मनोज साबळे आणि मला ही संकल्पना सुचली आणि आम्ही ती प्रत्यक्षात राबविली. हा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरला.
- प्रमोद एकोणकार, शिक्षक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Voted for school CM