धक्‍कादायक... विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह पुरला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

भांबरखेडा शिवारातील रस्त्याच्या बाजूला दूरसंचार विभागाचे केबल टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्याचा मृतदेह पुरला. मात्र, पाय उघडा पडल्याने भांबरखेडा ग्रामस्थांच्या लक्षात ही घटना आली. 

मुळावा (जि. यवतमाळ) : हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. मात्र, पाय उघडे राहिल्याने खुनाचे बिंग फुटले. ही घटना मंगळवारी (ता. तीन) भांबरखेडा शिवारात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शंकर डांगे (वय 14, रा. लासीना, जि. हिंगोली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लासीना येथील संतोष डांगे हा विद्यार्थी सोमवारी (ता. दोन) सकाळी आठला शाळेत जाण्यासाठी घरून गेला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे पालकांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. नातेवाईक व पोलिसांनी रात्रभर विद्यार्थ्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. भांबरखेडा शिवारातील रस्त्याच्या बाजूला दूरसंचार विभागाचे केबल टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्याचा मृतदेह पुरला. मात्र, पाय उघडा पडल्याने भांबरखेडा ग्रामस्थांच्या लक्षात ही घटना आली. 

हेही वाचा : दारुड्याच्या भरोशावर छकुल्याला सोडणार का? 

पोफाळी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार कैलास भगत यांनी पथकासह घटनास्थळ गाठत वरिष्ठांना माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी विकास तोटावार, "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. यवतमाळ येथील लुसी या श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. पोफाळी पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्याविरुद्घ गुन्हा नोंद केला. हा गुन्हा कळमनुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतदेह जमिनीत गाडला होता. त्यामुळे उमरखेड व पुसद महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला. विद्यार्थ्याचा खून कोणी व का केला? हे रहस्य मात्र, गुलदस्त्यातच आहे. 
 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, कुत्रा, बूट, बाहेरील आणि निसर्ग
मुळावा : विद्यार्थ्याच्या दप्तरातून सुगावा घेताना श्‍वानपथक. 

दप्तरामुळे पटली ओळख 

भांबरखेडा येथील घटनास्थळापासून काही अंतरावर विद्यार्थ्याच्या शाळेचे दप्तर आढळून आले. त्यामुळे मृताची ओळख पटण्यास मदत झाली. त्याआधारेच पोलिसांनी कळमनुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. याच विद्यार्थ्याचे अपहरण झाले असून, गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The student was murdered and the body was buried