भरपावसातही विद्यार्थ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन; महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी
यवतमाळ : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांवर शासनाने महापरीक्षा पोर्टल लादले आहे. येणाऱ्या प्रत्येक परीक्षा ऑनलाइन असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी (ता.29) काढण्यात आलेल्या मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होत "एल्गार' पुकारला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ विधानसभाप्रमुख बिपिन चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक शिवाजी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. पावसाची रिमझिम सुरू असतानाही हजारो युवक व युवतींनी आंदोलनात सहभाग घेतला. पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्‍वास राहिलेला नाही. नुकत्याच झालेल्या तलाठीपदाच्या परीक्षेत ज्या उमेदवारांकडे ई-आधार कार्ड होते. त्या उमेदवारांना परीक्षेसाठी बसू देण्यात आले नाही. वनविभागाच्या भरतीत "उने' पद्धत असतानाही एका विद्यार्थ्याला 120की 118.5 गुण मिळाले. ही बाब विद्यार्थ्यांच्या मते संशयास्पद आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलतर्फे घेतलेल्या सर्व परीक्षांची तपासणी "एसआयटी'मार्फत व्हावी, अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांनी केली. याशिवाय, पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाइन स्पर्धा परीक्षा बंद करा, एक परीक्षा एक पेपर घेण्यात यावा, पोलिस भरतीप्रक्रिया शासन निर्णय 2018 रद्द करून पूर्वीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात यावी, शिक्षक भरतीत पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढून शिक्षकांची भरती करावी, स्पर्धा परीक्षा शुल्क शंभर रुपये घेण्यात यावे, जिल्हास्तरीय समितीमार्फत स्पर्धा परीक्षा घेण्यात यावी आदी मागण्याबाबत विद्यार्थ्यांनी प्रशासनावर "प्रहार' केला. शहरात सकाळपासून पाऊस सुरू होता. भरपावसातही शहरातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students' agitation in compensation