कोरोनाची कृपा आणि कॉपी बहाद्दरांची मज्जा; ऑनलाइन परीक्षेत पुस्तक, गाइड उघडून सोडवतात पेपर

students are doing copy while online exams in gondwana university
students are doing copy while online exams in gondwana university

गडचिरोली  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा घेऊ नये की, घ्याव्यात यावर बराच काथ्याकूट झाला. अखेर ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरले. पण, या ऑनलाइन परीक्षेमुळे कॉपी बहाद्दरांचे चांगलेच फावले आहे. घरीच बसून मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर पेपर सोडवायचा असल्याने अनेकजण बिनदिक्‍कत पुस्तक, गाइडमधून शोधून उत्तरे लिहीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षाच घेऊ नये, असे अनेकांचे मत होते. अखेर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा तोडगा निघाला. पण, यात विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीच यंत्रणा किंवा व्यवस्था नसल्याने अभ्यास न करता कॉपी करण्याची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांची चांदी झाली आहे. मात्र, अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. घरीच बसून पुस्तक, गाइड, मित्र, मार्गदर्शक किंवा ओळखीच्या कुणाचीही मदत घेऊन पेपर सोडवता येत असल्याने, ज्यांनी अभ्यास केला नाही, असे विद्यार्थीसुद्धा परीक्षेत भरघोस गुण मिळवतील, असेच चित्र दिसत आहे.

गोंडवाना विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०१९- २०२० मधील पदवी-पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम वर्षातील बॅकलॉग विषय असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ५ ऑक्‍टोबरपासून सकाळी ९ वाजता नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे ठरवले होते. परंतु विद्यापीठात निर्माण झालेल्या इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे ऐनवेळी सकाळचा पेपर दुपारी २ वाजता सुरू करण्याची सूचना विद्यापीठाद्वारे देण्यात आली होती. ही तांत्रिक अडचण वेळीच दूर न झाल्याने विद्यापीठावर हा पहिलाच पेपर रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. 

त्यानंतर १२ ऑक्‍टोबरला पेपर घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. या दुसऱ्या प्रयत्नात मात्र काहीही अडचण न येता पेपर पार पडला. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांतील अंतिम वर्षातील १८ हजार ५०० विद्यार्थी ऑनलाइन, तर ७५० विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेला बसले आहेत. पण, ऑनलाइन परीक्षेतील ही कॉपीची पद्धत नवे आव्हान निर्माण करणारी आहे.

ना वर्ग, ना शिक्षक, ना भरारी पथक

एरवी परीक्षा घेतली जाते तेव्हा अनेक काटेकोर नियम असतात. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या खोलीत जाताच आपल्याकडील पुस्तक, कागद, मोबाईल, कॅलक्‍युलेटर असे सगळे साहित्य शिक्षकाच्या टेबलवर ठेवावे लागते. शिवाय परीक्षा केंद्रात नेमलेल्या शिक्षक, प्राध्यापक व दक्षता अधिकाऱ्यांची विद्यार्थ्यांवर नजर असते. कुणावर संशय आल्यास तपासणी करतात किंवा कॉपी करताना आढळून आल्यास कारवाई होते. याशिवाय कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी भरारी पथकेही विविध परीक्षा केंद्रांना भेटी देत असतात. पण, ऑनलाइन पद्धतीत हे काहीच करता येत नसल्याने कॉपी बहाद्दरांना रान मोकळे झाल्याचे दिसून येत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com