विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

नागपूर - राज्यातील टंचाईग्रस्त गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढला. योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. परंतु, प्रत्यक्षात एकाही शाळेत बायोमेट्रिक हजेरीची सोय नसल्याने विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि इतर शाळा नऊ मेपर्यंत सुरू राहणार आहेत. यादरम्यान केंद्राच्या निकाषानुसार १५१ तालुके, २६६ महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. या तालुक्‍यात आणि महसूल मंडळातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी दीड महिना पोषण आहाराची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमधील गावे दुष्काळग्रस्त यादीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत गावातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतेच आदेशही काढले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील किती गावांमध्ये पोषण आहार द्यावा लागेल, याचे प्रत्येक तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण केले. या गावांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार  योजनेअंतर्गत उन्हाळ्यात दीड महिना पोषण आहार शाळेतच देण्यात येणार आहे.  मात्र, सरकारने यंदापासून नवीन बदल केला असून, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेऊनच पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील किती शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी आहे, याची माहिती मागविली होती. यावर सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकाही शाळेत तशी व्यवस्थाच नसल्याचा धक्कादायक अहवाल दिला. तेव्हा बायोमेट्रिक हजेरी नसल्याने या गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर ओढवलेले संकट प्रशासन कसे दूर करणार, हे कळायला मार्ग नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com