esakal | Video : हिमाचल प्रदेशात अडकलेले नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी परतले अन् पालकांनी सोडला सुटकेचा निश्‍वास
sakal

बोलून बातमी शोधा

buldana navodya student.jpg

शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववीचे 21 विद्यार्थी बारा मुली व नऊ मुले असे मायग्रेशन योजनेअंतर्गत शिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेले होते.

Video : हिमाचल प्रदेशात अडकलेले नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी परतले अन् पालकांनी सोडला सुटकेचा निश्‍वास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यातील शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी मायग्रेशन योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेलेले होते. लाॅकडाउननंतर हे सर्व विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा प्रशासन व सर्वांच्या प्रयत्नाने सदर विद्यार्थी आज (ता.7) शेगावात सुखरूप दाखल झाले आहेत.

शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववीचे 21 विद्यार्थी बारा मुली व नऊ मुले असे मायग्रेशन योजनेअंतर्गत शिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 25 मार्च 2020 रोजी संपले. तेव्हापासून सदर विद्यार्थ्यांना घरी येण्याची ओढ लागून राहिली होती. मात्र, लाॅकडाउनमुळे वाहतूक व्यवस्था नसल्याने या सर्व विद्यार्थ्यांना घरी कसे आणायचे असा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी समोर होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने एक खास आदेश काढून अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचे आदेश दिले होते. 

हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा

त्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करून सदर विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचविण्याची निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर चंबा येथून हे विद्यार्थी हिमाचल प्रदेश मधून राजस्थान पर्यंत एका खासगी बस द्वारे आणण्यात आले. तर शेगाव येथून जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाची एक शिवशाही बस सदर विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठविली होती. ही बस आज सकाळी सात वाजता सर्व विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन सुखरूप पोहोचली.

यामुळे काळजीत पडलेल्या सर्व पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सदर विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी नंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. या या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी वारंवार प्रयत्न करून शासनापर्यंत प्रशासनापर्यंत हा विषय पोहोचविला होता. त्यामुळे तातडीने सूत्रे हलली व विद्यार्थ्यांना परत आणण्याची कार्यवाही सुरू झाली होती. सुमारे सोळाशे किलोमीटर प्रवास करून हे सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचल्याने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.