विद्यार्थ्यांचा एसटी बससाठी चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

देसाईगंज (जि. गडचिरोली) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नियमित व वेळेवर सोडल्या जात नसल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याच समस्येला कंटाळून गुरुवारी सायंकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे महामार्गाची वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती.

देसाईगंज येथील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये तालुक्‍यातील अनेक गावांतून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ये-जा करतात. मात्र, या बस नियमित सोडल्या जात नाहीत. बसला वारंवार उशीर होत असल्याने गावी परत जाण्यास विद्यार्थ्यांना उशीर होतो. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी देसाईगंज येथील बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यापुढे बससेवा नियमित दिली जाईल. कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही, असे आश्‍वासन महामंडळाने द्यावे, तरच आंदोलन मागे घेऊ, असे विद्यार्थ्यांनी ठणकावून सांगितले. इकडे आरमोरी, कुरखेडा, नागपूर या मार्गावरची वाहतूक ठप्प पडल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी उशीर झाल्याने पालक चिंतेत होते. अशा परिस्थितीत ठाणेदार प्रदीप लांडे यांनी मध्यस्ती करून विद्यार्थ्यांची समजूत काढली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students strike for ST bus