विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

अमरावती - अमेरिकेतील आधुनिक तंत्रज्ञान तथा तेथील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे ज्ञान आपल्याकडील विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया प्रांतातील डेलावेर विद्यापीठाशी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. व्हीवायडब्ल्यूएसच्या या सामंजस्य करारामुळे संस्थेसह इतर केजी टू पीजी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक दालन उघडे होणार आहे. 

विदर्भातील एका संस्थेशी झालेला हा बहुधा पहिलाच प्रयोग आहे. ज्ञानाच्या आदान-प्रदानाने शैक्षणिक कक्षा रुंदावून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी उपलब्ध होईल. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी अथक प्रयत्नातून हा करार घडवून आणला. मागील एका वर्षापासून या करारासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. 

डेलावेर विद्यापीठातील प्रोग्राम को-ऑर्डिनेटर लिन फिशलॉक व अनघा बेदरकर (बोके) यांच्या विशेष प्रयत्नाने हा करार झाल्याचे डॉ. धांडे यांनी सांगितले. ४ डिसेंबरला या करारावर स्वाक्षरी होईल. प्रसंगी डेलावेर विद्यापीठाचे काही प्रतिनिधी तेथे उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे डेलावेर विद्यापीठातील कोर्सेस करता येतील. 

विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात संस्थेशी संपर्क साधावा, असे डॉ. धांडे म्हणाले. अध्यक्ष धांडे यांच्यासह उपाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारिणी सदस्य नितीन हिवसे, ॲड. उदय देशमुख, प्रा. गजानन काळे, प्रा. रागिणी देशमुख यांचेही सहकार्य लाभले आहे.

ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर 
संस्थेने केलेल्या या कराराच्या माध्यमातून संस्थेतील विद्यार्थ्यांना डेलावेर विद्यापीठातील तांत्रिक विभाग, संशोधन, विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान, ऑनलाइन कोर्सेस, तंत्रज्ञान, रोबोटिक्‍स, क्‍लिनिकल ट्रायल्स तथा सायबर सिक्‍युरिटीज अशा विविध क्षेत्रांचे आदान-प्रदान होईल.  डेलावेर विद्यापीठात केलेल्या ऑनलाइन कोर्सचे प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना मिळेल.

Web Title: Students will get international quality education

टॅग्स