यालाच म्हणतात खेळाडू; अपघातातून बचावले अन रौप्यपदक पटकावले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

खेळाडूंनी मरण समोर बघितले. क्षणात काय झाले काहीच कळले नाही. गाडीच्या धडकेच्या आवाजाबरोबर किंकाळ्या निघाल्या. त्यांना झालेल्या जखमांमधून रक्त निघायला लागले. सारे काही अकल्पित घडले. ईतका भीषण अपघात होऊनही मरणाच्या दारातून हे सर्व खेळाडू परतले होते. 

अमरावती : नाशिक जिल्ह्यातील खो-खोचा संघ शालेय राज्य स्पर्धेसाठी अमरावतीकडे जात होता. अचानक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. कोण कुठे फेकले गेले...? कोण कुणाच्या अंगावर...? कोण काचेवर... कोण कुठे?, कुणालाच काही कळले नाही. गाडीच्या धडकेच्या आवाजाबरोबर तोंडातून बाहेर पडलेल्या किंकाळ्या आणि जखमांतील रक्त... जोराचा मार... सगळं काही अकल्पित. सुदैवाने मरणाच्या दारातून हे खेळाडू परतले अन नुसते परतले नाही तर रौप्यपदकही पटकावले. 

नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्‍यातील अलंगून येथील आदिवासी आश्रमशाळेतील खो-खोचा संघ शालेय राज्य स्पर्धेसाठी अमरावतीकडे जात असताना अकोल्यापासून 12 किमी अंतरावर बोरगावमंजूनजीक 27 नोव्हेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला.

समोरून येणाऱ्या ट्रकने 13 खेळाडू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्‍स गाडीला उडविले होते. अपघात एवढा भयानक होता की, गाडीची अवस्था पाहून गाडी पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नव्हता. अपघातात गंभीर जखमींमध्ये शिक्षक तुकाराम गावीत, महेश पवार, तर खेळांडूमध्ये कल्पेश सहारे, रोशन गायकवाड, प्रभाकर धूम यांचा सहभाग आहे. 

सारे काही अकल्पित
खेळाडूंनी मरण समोर बघितले. क्षणात काय झाले काहीच कळले नाही. गाडीच्या धडकेच्या आवाजाबरोबर किंकाळ्या निघाल्या. त्यांना झालेल्या जखमांमधून रक्त निघायला लागले. सारे काही अकल्पित घडले. ईतका भीषण अपघात होऊनही मरणाच्या दारातून हे सर्व खेळाडू परतले होते. 

हेही वाचा : video : अंध 'ईश्‍वर; गातो आईचे गोडवे

ओढ राज्य स्पर्धेची 
अचानक घडलेल्या या प्रसंगाने बसलेला मानसिक धक्का खूप मोठा होता. अशावेळी मायेचा ओलावा अन्‌ प्रेमाचा घास दिला तो अकोलेकर शारीरिक शिक्षण शिक्षकांनी. चेहऱ्यावर भय होते. पण, ओढ मात्र राज्य स्पर्धेची होती. कठीण प्रसंगात यशाचा मार्ग हाताळण्यासाठी स्थिर चित्त, मनाचा कणखरपणा व पराभव समोर दिसू लागला असताना त्यातून बाहेर पडून जिंकण्यासाठी मानसिक स्थैर्य, जिंकण्याची जिद्द व कुठल्याही प्रसंगी न हारण्याचे कसब, जे मैदानावर शिक्षकांनी शिकवले ते येथे कामी आले. 

अशा परिस्थितीतून बाहेर पडत राज्य शालेय खो-खो स्पर्धेत बलाढ्य अशा उस्मानाबाद संघाशी निकराचा लढा देत नुसते रौप्यपदकच नाही जिंकले, तर शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या मेहनतीला आयाम देत महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण परिवारातील सर्वांचा विश्वास अन्‌ मने जिंकली. 

शारीरिक शिक्षण महत्त्वाचे 
जीवनरूपी मैदानात अनेक संकट येतात. ते झेलून अडचणींवर मात करून आयुष्याच्या खडतर वाटेवरील काटे वेचून यशाची फुले उधळायची शिकवण शारीरिक शिक्षक देतात. याचेच महत्त्व या प्रसंगाने अधोरेखित झाले. 
- राजेंद्र कोतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students won silver medel on inter school competition