उपराजधानी बनतेय अवयदानाचे हब

file photo
file photo


नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. परंतु, काही जण मृत्यूनंतरही अवयवदानातून दुसऱ्यासाठी जगू शकतात, इतरांच्या जीवनात प्रकाश पेरू शकतात. 50 मेंदूमृतांच्या अवयवदानामुळे 128 जणांना जीवनदान मिळाल्याची क्रांती उपराजधानीतूनच झाली आहे. यकृत, फुप्फुसासह हृयाच्या प्रत्यारोपणाची सुविधा नागपुरात उपलब्ध झाली आहे. यामुळे नागपूरची अवयवदानाचे हब बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
ब्रेन डेड (मेंदूमृत्यू) झाल्यानंतर 50 जणांचे अवयवदान मृत्यूच्या दाढेत आयुष्य जगत असलेल्यांसाठी जीवदान ठरले. 89 जणांना मूत्रपिंड तर 37 व्यक्तींना यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. याशिवाय चेन्नई, औरंगाबाद व मुंबईमध्ये हृदयाची गरज असलेल्यांना नऊ हृदयदान करण्यात आले. दोघांना जीवनदान देण्यासाठी उपराजधीतून यकृत बाहेर पाठवले. शहरात फुप्फुसासह आता हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे, असे विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी यांनी सांगितले.
विशेष असे की, अवयवदांचे महत्त्व सांगत मृत्यूनंतर अवयवांचे दान करा, असा संदेश देणारे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या संयुक्त कामगिरीतून अवयवदानाच्या चळवळीला उपराजधानीत गती मिळाली आहे.

"ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर' पद
अवयवदानाबद्दल जागृती करण्यासाठी "ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर' हे पद शासकीय रुग्णालयांसहित ज्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण होते, अशा सर्व खासगी रुग्णालयात असावे, अशी सूचना पुढे आली. अवयनदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर सोपवावी. सध्या विभागीय अवयवदान समितीत समन्यवयाची भूमिका अतिशय प्रभावीपणे निभावण्याची जबाबदारी वीणा वाठोरे सांभाळत आहेत.

मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळू शकते, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. अवयवदानातून जीवनदानाच्या या महायज्ञात काम करण्याची संधी मिळत आहे याचे समाधान आहे.
- डॉ. विभावरी दाणी,
अध्यक्ष, विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com