माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

तुमसर (जि. भंडारा) : येथील माजी आमदार सुभाषचंद्र नारायणराव कारेमोरे (वय 84) यांचे आज, बुधवारी दुपारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी 12 वाजता वैनगंगेच्या कोष्टी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुभाषचंद्र कारेमोरे हे तुमसरचे माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदार नारायणराव कारेमोरे यांचे ज्येष्ठ पुत्र होते. सुभाषचंद्र 1978 मध्ये इंदिरा कॉंग्रेसच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर दोन वर्षातच निवडणुका झाल्या. 1980 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून ते पुन्हा विजयी झाले. त्यानंतर 1985 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे 1990 मध्ये त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली. तेव्हा बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. ते विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे खंदे समर्थक होते. मतदारसंघातील विकासकामांबाबत ते आग्रही व आक्रमक होते. काही दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास होता. नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले. उद्या, गुरुवारी सकाळी तुमसर येथील राजेंद्रनगरातील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे व आप्तपरिवार आहे.

Web Title: subhashchandra karemore passes away