बांधावरील वृक्षांसाठी मिळणार अनुदान : अभिमन्यू काळे

अभिमन्यू काळे
अभिमन्यू काळे

नागपूर  : शेतांमधील वृक्षांची तोड थांबविण्यासाठी सरकारने शेती व शेतीच्या बंधाऱ्यावरील वृक्षांच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची नावीन्यपूर्ण योजना राज्यात राबविण्याचा प्रस्ताव आहे. गोंदिया जिल्ह्यात यश आल्यानंतर आता शासनाच्या मदतीने राज्यभर ही योजना राबविण्याच्या दृष्टीने काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.
शेताच्या बांधावरील वृक्षसंवर्धन योजनेच्या पहिल्या बैठकीसाठी शहरात आले असता त्यांनी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ते म्हणाले, या योजनेच्या राज्यभरातील अंमलबजावणीच्या दृष्टीने अभ्यासासाठी समिती स्थापन केली आहे. गोंदियात जिल्हाधिकारी असताना मी ही योजना यशस्वी करून दाखवली होती. बांधांवरील वृक्षतोड थांबवण्यासाठी ही योजना राबवली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या जिल्ह्यातील वृक्षांच्या तोडीवर प्रतिबंध लागला होता. या योजनेबद्दल गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री परिणय फुके यांच्याकडे स्थानिकांनी पाठपुरावा केला होता. आता ही योजना राज्यभरात राबविण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. सारस आणि माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी अशाप्रकारच्या योजना प्रस्तावित असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टवर पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. आतापर्यंत दोन कवींसोबत विविध रिसॉर्टवर पौर्णिमा महोत्सव झाले. त्यांचे थेट प्रक्षेपण सर्व रिसोर्टवर करण्यात येते. असेच कार्यक्रम स्थानिक रिसोर्टवर प्रत्येक महिन्याला घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर विभागातील बोदलकसा, ताडोबा, नागपूर येथील रेस्टॉरंट एमटीडीसीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहेत. पर्यटनासाठी नागपूर, चिखलदरा आणि लोणार तसेच बोदलकसा, पेंच, चिखलदरा आणि लोणार असे दोन सर्किट विकसित केले आहेत. पुण्यासाठी महाबळेश्‍वर, गणपती पुळे, हरिहरेश्‍वर, कणकवली आणि तारकर्ली हे सर्किट आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारच्या खोल्या रिसॉर्टच्या परिसरात बांधण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याचेही एका प्रश्‍नाच्या उत्तरात काळे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com