उपराजधानीत चोरट्यांचा सुळसुळाट

file photo
file photo

नागपूर  : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, चोरीच्या तीन तर चेन स्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. नंदनवन हद्दीतील सुरभीनगर, खरबी येथील रहिवासी रूपेश बांगरे (31) बुधवारी सकाळी दाराला कुलूप लावून बाहेर पडला. चोरट्याने दाराचा कोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाचा कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व 7 हजार रुपये रोख असा एकूण 65 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
दाभा परिसरातील रहिवासी कमलाकर मेश्राम (56) सहकुटुंब राजस्थानातील अजमेर येथे गेले होते. चोरट्याने मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील हिरे, सोने व चांदीचे दागिने 35 हजार रुपये असा सव्वालाखाचा मुद्देमाल रोख चोरून नेला. जाताना चोरट्याने घरातील एलईडी टीव्हीसुद्धा सोबत नेला.रामदासपेठेतील जैन मंदिरामागे राहणारे महेश खंडेलवाल (27) यांचे भंडारा मार्गावरील सुरूची कंपनीच्या मागे दी खंडेलवार कॉर्पोरेशन नावाने गोदाम आहे. सोमवारी रात्रीनंतर चोरट्याने खुल्या गोदामातील 50 हजार रुपये किमतीच्या दोन लोखंडी पट्ट्या चोरून नेल्या. गुरुवारी रात्री पंधरा मिनिटांच्या अंतराने बेलतरोडी व धंतोली हद्दीत चेनस्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या. स्वरूपनगरातील रहिवासी पल्लवी शेंडे गुरुवारी रात्री 1015 वाजताच्या सुमारास पती अमोल यांच्या गाडीवर दोन वर्षीय मुलाला सोबत घेऊन जात होत्या. श्रीनगर चौक ते राजीवनगर चौकादरम्यान उड्डाणपुलावर 25 वर्षे वयोगटातील आरोपी दुचाकीने मागून आला. पल्लवी यांच्या गळ्यातील सोनसाखळी झटका देऊन तोडण्याचा प्रयत्न केला. पण, पल्लवी यांनी मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवले. यामुळे चोरट्याच्या हाती अर्धेच मंगळसूत्र लागले. तत्पूर्वी गजानन चौक, रेशीमबाग येथील रहिवासी हिमांशू शाहू (25) रात्री साई मंदिर येथून दर्शन घेऊन मित्रासोबत मोटारसायकलने परतत होता. एफसीआय गोदामाजवळ दुचाकीने आलेल्या 20 वर्षे वयोगटातील आरोपीने हिमांशूच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.
किराणा साहित्य भरलेला ट्रक पळविला
रायपूरचे रहिवासी जफरुद्दीन खान (50) किराणा साहित्य भरलेला ट्रक घेऊन नागपूरकडे येत होते. गुरुवारी मध्यरात्री कळमना रिंग रोड येथे लघुशंकेसाठी थांबले. त्याचवेळी दोन आरोपी मोपेडने पोहोचले. धक्काबुक्की करीत साहित्याने भरलेला अख्खा ट्रक पळवून नेला. खान यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com