या शेतकऱ्याने करून दाखवले, 45 व्या वर्षी झाला तलाठी..! (व्हिडिओ)

संदीप रायपुरे 
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

तरुणानांही लाजवेल अशा संघर्षमय स्थितीत यशाची पायरी गाठणाऱ्या शेतकऱ्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणेची शिदोरीच ठरली आहे. देविदास तुकाराम ठेंगणे गोंडपिपरी तालुक्‍यातील नांदगाव येथील रहिवासी. 2003 मध्ये त्यानं गोंडपिपरीच्या कला वाणिज्य महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यांनतर त्यांनी एम.ए देखील केलं. नौकरीसाठी प्रयत्न केले पण यश आले नाही. परिस्थितीशी तडजोड करत त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कधी ओल्या तर कधी सुक्‍या दुष्काळानं बळीराजाचं कंबरडं मोडणं नित्याचच झालयं. शेती करावी तरी कशी? या च्रकव्युहात ते पुरते फसले आहेत. अशात पंधरा वर्षे शेतीत घाम गाळणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने पुस्तकांशी गटटी केली अन यशही मिळवलं. सातबारा मिळवण्यासाठी चकरा मारणारा हा शेतकरी आता इतर शेतकऱ्यांचे सातबारे तयार करणार आहे. कारण तो तलाठी झालाय..! 

तरुणानांही लाजवेल अशा संघर्षमय स्थितीत यशाची पायरी गाठणाऱ्या शेतकऱ्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणेची शिदोरीच ठरली आहे. देविदास तुकाराम ठेंगणे गोंडपिपरी तालुक्‍यातील नांदगाव येथील रहिवासी. 2003 मध्ये त्यानं गोंडपिपरीच्या कला वाणिज्य महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यांनतर त्यांनी एम.ए देखील केलं. नौकरीसाठी प्रयत्न केले पण यश आले नाही. परिस्थितीशी तडजोड करत त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. लग्नही केलं. आपल्या शेतीत वर्षभर मेहनत तो घेऊ लागला. पोटापाण्याच्या गडगडीत पुस्तकांची साथ तर सुटलीच होती. आता केवळ शेती एके शेती असाच विषय होता. 

एक मुलगा, मुलगी, पत्नी अनं तो शेती करीत संसाराचा गाढा पुढे रेटायचे. 2004 सालापासून शेती करणाऱ्या देविदासला अनेकदा कधी ओल्या तर कधी सुक्‍या दुष्काळाचा फटका सहन करावा लागला. अगदी हातात येणारे पीक अनेकदा नष्ट झाले. अशात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तलाठी पदाची जाहिरात काढली. यात अंशकालीन पदवीधर या प्रवर्गासाठीही जागा होती. देविदासने याआधी अंशकालीन म्हणून काम केले होते. अंशकालीन कोट्‌यासाठी देखील भरपूर स्पर्धा असते. अशावेळी अभ्यासासाठी शेतीचा हंगाम सोडणे शक्‍य नव्हते. म्हणून त्याने शेतात काम करता करता प्रचंड अभ्यासही केला. परीक्षा ऑनलाईन होणार असल्याने त्याने काही दिवस मित्राकडील संगणकावर सरावही केला. अन परीक्षेला सामोरे गेला. 

शेतातच मिळाली गोड बातमी 
परीक्षेनंतर बरेच दिवस निकाल न आल्याने तो आपली निवड होणार नाही असा समज करून निराश झाला. पण काल अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याच्या मोबाईलवर फोन आला. मात्र त्याचा मोबाईल घरी होता व देविदास शेतात गेला होता. मुलीने फोन उचलला व तिला बातमी समजली. सायंकाळी देविदास परत आल्यावर त्याने फोन आलेल्या नंबरवर परत फोन केला व त्याच्या निवडीची गोड बातमी समजली. ऐन दिवाळीत आपल्या मेहनतीचे चिज झाल्याची भावना त्याच्या मनात आली. 

आता इतरांना देणार सातबारा 
देविदास आता 45 वर्षाचे आहेत. त्यांचा मुलगा प्रज्वल हा इयत्ता आठवीत तर मुलगी प्रणाली सहावीत शिकते. सतत पंधरा वर्षे शेतीची कास धरणाऱ्या देविदास यांनी शेतीत अभ्यास करून मिळविलेले यश इतरांसाठी प्रेरणादाईच आहे. सातबारा मिळविण्यासाठी तलाठ्याकडे चकरा मारणारा देविदास आता स्वत: आपल्या बांधंवाना सातबारे देणार आहे. कारण तो तलाठी झाला आहे. 

या वयात हा काय करणार अभ्यास करून? असा प्रश्‍न उपस्थित करून गावातील लोक टिंगलटवाळी करायचे. पण मी अभ्यासाची साथ सोडली नाही. त्याचेच फळ मला मिळाले आहे. 
- देविदास ठेंगणे, नांदगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story of farmer became talathi