"नवनिर्मिती'साठी एकवटली युवाशक्ती, पाणी अडवा-पाणी जिरवा'चा यशस्वी प्रयोग 

रवींद्र कुंभारे 
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

गुमगाव, (जि. नागपूर) : कुणी दिवा लावण्याचा दृढनिश्‍चय केलाच असेल तर वारा जोराने वाहतो आहे, हे कारण निरर्थक आहे. एका दिव्याने इतर चार दिवे प्रज्वलित होतात. असाच काहीसा "आशेचा दिवा' वागदरा (नवीन गुमगाव) येथील युवकांनी वागदरा-धानोली परिसरात प्रज्वलित केला. विधायक कार्याच्या पाठीशी जनशक्ती उभी राहिली की काय चमत्कार घडू शकतो, याची प्रचिती युवाशक्तीच्या कार्यातून दिसून येत आहे. लोकसहभाग आणि श्रमदानातून करण्यात आलेल्या युवकांच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांकडून कौतुकाची थाप पडत आहे. 

गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, धानोली, कान्होली भागामध्ये वाहणारी वेणा नदी काही वर्षांपासून ऐन हिवाळ्यामध्येच कोरडी पडते. त्यामुळे संपूर्ण भागामध्ये पाण्याचा भीषण दुष्काळ पडतो. वेणा नदीच्या काठावर येऊन सगळीकडे नजर फिरविली तरी पाणी कुठे शोधूनही सापडत नाही. जसा जसा उन्हाळा तापत जातो तसेतसे परिसरातील नागरिक पाण्यासाठी दाही दिशा फिरत असतात. या सर्व परिस्थितीसमोर शस्त्र न टाकता, कोणत्याही शासकीय मदतीची वाट न बघता स्वतःचे मनोबल वाढवून परिस्थितीशी दोन दोन हात करण्यासाठी आशावादी युवक एकत्र आले. 
या सर्वांनी "एकीचे बळ' दाखवत वागदरा येथील वेणा नदीवर "पाणी अडवा-पाणी जिरवा' उपक्रमांतर्गत गावाच्या पश्‍चिमेस असलेल्या बंधाऱ्यावर पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या प्रयोगामुळे परिसरातील गावांमध्ये शेतीसाठी संरक्षित पाणी मिळून सिंचन व पेयजल क्षेत्रात वाढ होण्यास मदत मिळणार आहे. 

रास्ता हमे खुद बनाना हैं 
नदीवरील बंधाऱ्यावर पाणी अडवून पाण्यासाठी गावकऱ्याच्या डोळ्यातून निघणारे अश्रू कायमचे पुसायचे. लोकसहभाग आणि श्रमदानातून नदीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नदीचे फुललेले सौंदर्य बघून आपले "एकीचे बळ' सार्थ झाल्याचे समाधान सरपंच प्रेमनाथ पाटील, उपसरपंच किशोर पडवे, अक्षय कामडी, जितेंद्र वैद्य, प्रदीप किरनाके, दिनेश गांजुडे, विलास गांजुडे, हरी दुर्गे, नरेश गांजुडे यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. "हमारी मंजिल तो आसमान है, रास्ता हमे खुद बनाना हैं' असे या युवकांचे ध्येय आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful experiment of water adva-water jirava