असे काय घडले की ती ताठपणे चालायला लागली 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

मणका घसरल्याने 10 वर्षांची चिमुकली किमया (नाव बदलले आहे) कमरेत वाक येऊन तिरपी चालायची. वाक वाढत गेल्याने तिला चालायला खूप त्रास व्हायला लागला. खेळणं तर जवळजवळ बंदच. एवढ्या लहान मुलीला हे काय झालं म्हणून आईवडीलही चिंतेत होते. पण काहीच दिवसांपूर्वी सर्च येथील मॉं दंतेश्‍वरी दवाखान्यात मुंबई येथील स्पाइन फाउंडेशनच्या चमूने तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे व्यवस्थित उभीदेखील राहू न शकणारी किमया आज ताठपणे चालायला लागली आहे.

गडचिरोली : दहा वर्षांची किमया आता तिसऱ्या वर्गात आहे. खेळकर असलेल्या किमयाला दोन वर्षांपूर्वी शाळेत खेळता खेळता लोखंडी पाळणा लागला. तेव्हापासून हळूहळू तिच्या चालण्यात थोडा बदल व्हायला लागला. कंबरेत व मानेत वाक यायला लागला. वर्षभरात हा वाक वाढत गेल्याने तिला चालतानाही त्रास व्हायला लागला. ती छाती काढून चालायला लागली. इतक्‍या लहान मुलीवर एवढी अवघड शस्त्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच झाली. 

चालताना पायही तिरपे टाकायची. तेव्हा ती आजीकडे शिकत होती. आजी तिला खूप रागवायची. चार ते पाच महिन्यांपूर्वी तिच्या कंबरेतील वाक खूप लक्षात यायला लागल्याने तिला ब्रह्मपुरीला एका दवाखान्यात नेऊन एक्‍स-रे काढला असता मणक्‍याला दुखापत असल्याने सांगण्यात आले. 

Image may contain: one or more people and people standing
गडचिरोली : शस्त्रक्रियेपूर्वीची चिमुकलीची स्थिती.

मणक्‍याला गंभीर दुखापत 

आई-वडील दोघेही चिंतेत पडले. मणक्‍याच्या आजारावर सर्च येथील मॉं दंतेश्‍वरी दवाखान्यात उपचार होत असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे ते किमयाला घेऊन सर्चमध्ये आले. तिची संपूर्ण तपासणी केली असता मणक्‍याला गंभीर दुखापत असल्याचे लक्षात आले.

Image may contain: one or more people and people standing
गडचिरोली : शस्त्रक्रियेनंतर सरळ झालेला पाठीचा कणा.

शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता

ही यशस्वी शस्त्रक्रिया करणारे स्पाइन डॉ. शेखर भोजराज म्हणाले की, किमयाचा एक्‍स-रे काढला असता मणक्‍यातील खालच्या भागातील नस जास्त प्रमाणात दबल्या गेल्याचे तिचा कंबरेचा वाक वाढत चालला होता. 

कसं काय बुवा? : किती ही मस्ती? गंमत म्हणून केले असे अन्‌...

आता ती ताठ उभी 

शस्त्रक्रियेने दबलेली नस मोकळी करून कमकुवत झालेला मणका मजबूत करण्यात आला. आता ती अगदी ताठ उभी राहू शकते. किमयादेखील धाडसाने या शस्त्रक्रियेला सामोरी गेली. एस आकारासारखी वाक दिसणारी किमयाची कंबर आज पूर्ण सरळ झाली आहे. मी लवकरच खेळणार, असा आत्मविश्‍वास घेऊनच किमया नुकतीच सुटी होऊन आपल्या घरी गेली. 

क्लिक करा : कोणी सोने विकत घेता का होऽऽ

शस्त्रक्रियेची ही पहिलीच वेळ 
अनेक वर्षांपासून स्पाइन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्च येथील मॉं दंतेश्‍वरी दवाखान्यात मणक्‍याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करीत आहोत. पण एवढ्या लहान मुलीवर शस्त्रक्रियेची ही पहिलीच वेळ होती. किमया केवळ 10 वर्षांची आहे. अशा वयात मणक्‍याचा एवढा वाक सामान्य बाब नव्हती. कधी काळी दुखापत झाल्याने तिच्या मणक्‍यातील खालच्या भागातील नस खूप दबली होती. परिणामी तिच्या कंबरेतील वाक वाढत चालला होता. शस्त्रक्रिया करून दबलेली नस मोकळी करण्यात आली. ही अवघड शस्त्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात यशस्वी झाल्याचा मनापासून आनंद आहे. 
- डॉ. शेखर भोजराज, स्पाइन सर्जन तथा अध्यक्ष, स्पाइन फाउंडेशन, मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful operation of the spine on a 10-year-old girl in Gadchiroli

Tags
टॉपिकस