कोहळेंच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व दक्षिणेतील भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले असून बुधवारी उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे फलक झळकावून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. 

दक्षिण नागपूमधून भाजपचे मोहन मते यांना उमेदवारी दिल्यानंतरच आमदार सुधाकर कोहळे व त्यांचे कट्ट्रर समर्थक चांगलेच संतापले आहे. कोहळे यांनी मित्रप्रेमापोटी आपले तिकीट कापल्याचा आरोप केला होता. तसेच कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील दिशा ठरवू असे सांगून बंडखोरीचे संकेत दिले होते. अद्याप त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र आज त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होऊन उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. रागाच्या भरात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने करून निषेधही व्यक्त केला. उत्साहाच्या भरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने केल्याने कोहळे अडचणीत येऊ शकतात असे बोलल्या जाते. 
नगरसेवकांची उपस्थिती 
दरम्यान, सुधाकर कोहळे यांनी आज दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ते फोनवरून बोलले. गडकरी यांनी त्यांना रात्री पुन्हा बोलावून घेतले. मात्र, या भेटीत काय झाले हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे गडकरींना भेटायला जाताना त्यांच्यासोबत नगरसेवक रवींद्र भोयर, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष संजय ठाकरे हेसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhakar kohle