मुनगंटीवारांचा इशारा कुणाकडे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नागपूर -  ‘अवनी’ प्रकरणावरून आपल्याला घेरण्यामागे भाजपतील काही लोक असल्याचे सूचक वक्तव्य खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांचा इशारा कुणाकडे आहे?, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

नागपूर -  ‘अवनी’ प्रकरणावरून आपल्याला घेरण्यामागे भाजपतील काही लोक असल्याचे सूचक वक्तव्य खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांचा इशारा कुणाकडे आहे?, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या महिन्यात पांढरकवडा जंगलात अवनी वाघीणीला ठार करण्यात आले. यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शांत झाला नाही. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचे स्थान आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘अवनी’वरून मुनगंटीवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. यामागेही भाजपतील काही नेत्यांची शिवसेनेच्या मंत्र्यांना फूस असल्याचे बोलले जात आहे. या मुद्यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये दोन गट पडलेले आहेत. विरोधकांनीही या मुद्यावरून मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच असल्याचे स्पष्ट केले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. राजीनामा मागण्याचा अधिकार केवळ अमित शहा यांना असल्याचे सांगत राजीनामा मागण्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुनगंटीवार यांनी गौण ठरविला काय? असा प्रश्‍न विचाराला जात आहे. ‘अवनी’वरून मुख्यमंत्र्यांनी योग्यप्रकारे संरक्षण दिले नसल्याची भावना मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये आहे. ‘पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही, हे मी आठ दिवसांपासून अनुभवत आहे’, या मुनगंटीवारांच्या वक्तव्याने पक्षातील सुंदोपसुंदी दिसून आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Sudhir Mungantiwar has made a statement saying that some people are surrounded by people in the 'Avani' case