चंद्रपुरात मुनगंटीवारांच्या प्रभावाला ग्रहण?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे.

नागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर गेल्या 15 वर्षांपासून खासदार असले तरी भाजपचा चेहरा म्हणून मुनगंटीवार होते. जिल्ह्यातील राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. ब्रह्मपुुरी नगर परिषदेच्या निकालाने या प्रभावावर आता प्रश्‍नचिन्ह लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नवरगाव, भीसी या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चांगले जाळे विणले आहे. भाजपचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी हे ब्रह्मपुरी येथील आहेत. भुसारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संघ परिवाराच्या प्रभावामुळे ब्रह्मपुरी नगर परिषदेवर भाजपचे सातत्याने वर्चस्व राहिले होते.

संघ परिवारातील अतुल देशकर यापूर्वी ब्रह्मपुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. या मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत देशकर यांचा पराभव केला होता. तेव्हापासून वडेट्टीवार यांनी संघाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न चालविले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भाग सर्वोत्कृष्ट तांदूळ उत्पादन करणारा भाग आहे. या भागातच तांदूळ व पोहा तयार करणाऱ्या मोठ्या गिरण्या आहेत. ब्रह्मपुरीचा विजय हा कॉंग्रेससाठी मोठा "बूस्टर डोस' ठरणार असून, मुनगंटीवार यांच्या एकहाती वर्चस्वाला निश्‍चितपणे धक्का लागल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Sudhir Mungantiwar Politics