साखर गाठणार चाळिशीचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नागपूर - साखरेच्या वायदे बाजारात सटोऱ्यांची सक्रियता वाढल्याने भाव तेजीवर आहेत. गेल्या दोन दिवसांत साखरेच्या निविदा वाढून क्विंटलला ३,७५० ते ३,८०० रुपयांपर्यंत गेल्या आहेत. तर, घाऊक बाजारात साखरेचा क्विंटलचा भाव ३,९०० ते ३,९५० रुपयांवर पोहोचल्याने किरकोळ बाजारात साखर चाळिशी गाठण्याची शक्‍यता आहे.

नागपूर - साखरेच्या वायदे बाजारात सटोऱ्यांची सक्रियता वाढल्याने भाव तेजीवर आहेत. गेल्या दोन दिवसांत साखरेच्या निविदा वाढून क्विंटलला ३,७५० ते ३,८०० रुपयांपर्यंत गेल्या आहेत. तर, घाऊक बाजारात साखरेचा क्विंटलचा भाव ३,९०० ते ३,९५० रुपयांवर पोहोचल्याने किरकोळ बाजारात साखर चाळिशी गाठण्याची शक्‍यता आहे.

उत्पादन घटल्याने सटोऱ्यांनी पुन्हा वायदे बाजारावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून कारखान्यांकडील साखरेच्या निविदा क्विंटलला सरासरी ८० ते ९० रुपयांनी वधारल्या. याबाबत घाऊक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्या साखरेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात मागणी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, भाव वाढण्याचे संकेत आहेत. मात्र, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांतील साखरेच्या निविदा चढ्या दरात जाण्यामुळे भाववाढीस चालना मिळाली. मंगळवारी क्विंटलचा भाव ३,७५० ते ३,८०० रुपयांवर पोहोचला. कारखान्यांकडून कमी भावात साखर विक्री करायची नाही, असेच धोरण असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळातही साखरेचे भाव वाढतील, असे चित्र आहे.

साखर आयुक्तालयाकडून थकीत एफआरपीची रक्कम असलेल्या कारखान्यांवर कारवाई होत आहे. १५ दिवसांपूर्वी संबंधित कारखान्यांचे परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, पूर्णपणे एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. उत्पादनशुल्क विभागाकडूनही साखर कारखानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्याने भीतीचे वातावरण होते. ती भीती कमी झाली असली तरी भाववाढ सुरू आहे. 

शेंगदाणे स्वस्त 
यंदा गुजरातमध्ये शेंगदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा आवक जास्त असल्याने शेंगदाण्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्यावर्षी एक किलो शेंगदाण्यासाठी १३५ रुपये मोजावे लागत होते. यंदा त्यात घसरण झाली असून यंदा प्रतिकिलोसाठी ११० रुपये मोजावे लागत आहेत, असे किराणा व्यापारी अनिल नागपाल यांनी सांगितले.

Web Title: sugar rate increase