दहावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नागपूर  : शिक्षक वारंवार मानसिक त्रास देत असल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता. 17) साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर  : शिक्षक वारंवार मानसिक त्रास देत असल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता. 17) साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यशोराज स्वामिनाथन जोसेफ (रा. सेंट मार्टीननगर) असे मुलाचे नाव आहे. तो सेंट जॉन शाळेत शिकतो. गत दोन वर्षांपासून त्याला पराग तुमाने नावाचे शिक्षक सातत्याने मानसिक त्रास देत आहेत. याबद्दल त्याने अनेकदा पालकांना माहिती दिली. पालकांनी याकडे दुर्लक्ष केले. पण, विद्यार्थ्यांसमोर अपमानित करणे, घालून-पाडून बोलणे, तुला टीसी मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा शिक्षकाने दिला होता. यामुळे आपल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला.
शुक्रवारी यशोराजने फिनाईलची बाटली खरेदी केली. घरी येऊन त्याने खोलीत जाऊन फिनाईल प्राशन केले. फिनाईल पिल्याने तो बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडून फेस येत होता. आईवडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले व तक्रार देण्यासाठी पालकांनी जरीपटका पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व उपसंचालकांनी तयार केलेल्या चाइल्ड राइट्‌स प्रशिक्षण पॅनेलचे सदस्य शाहिद शरीफ यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात यशोराजची भेट घेत पालकांची विचारपूस केली. या वेळी पोलिस तक्रार घेत नसल्याचे कळताच त्यांनी पोलिसांना यशोराज आणि पालकांचे बयाण घेण्याची विनंती केली. यानंतर पोलिसांनी तक्रार घेत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.
अधिकाऱ्यांचा मदतीस नकार?
घटनेची माहिती कळताच शाहिद शरीफ यांनी महिला व बालकल्याण अधिकारी विजय परदेशी यांना कळविले. मात्र, त्यांनी मदतीस नकार दिला, असा आरोप बालहक्क समितीचे पदाधिकाऱ्यांनी केला.
शाळा प्रशासन मौन
या घटनेबद्दल शाळा प्रशासनाला विचारणा केली; मात्र कोणीच प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे, शाळेत प्राचार्य आणि उपप्राचार्य पद रिक्त आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी पर्यवेक्षक कुंभलकर यांच्यावर आहे. प्रयत्न करूनही त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. 
 

 

Web Title: suicide attempted of student